मुंद्रा पोर्टवर किरणोत्सारी पदार्थ जप्त, पाकिस्तानचे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 07:14 AM2021-11-20T07:14:02+5:302021-11-20T07:14:42+5:30
कस्टम विभागाची कारवाई, पाकमधून चीनला पाठवलेला माल
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पाेर्टवर जप्त केले आहेत. हे पदार्थ असलेले कार्गाे कंटेनर्स मुंद्रा पाेर्टवर येणे अपेक्षित नव्हते. अदानी पोर्टस आणि एसईझेडतर्फे ही माहिती देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कस्टम व महसूल गुप्तचर विभागाने ही कारवाई केली आहे. जप्त केलेले कार्गाे कंटेनर्स धाेकादायक नसलेल्या श्रेणीत दाखविण्यात आले हाेते. मात्र, ते धोकादायकच होते. कंटेनर्समध्ये नेमके काेणते पदार्थ आहेत, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हे कंटेनर्स कराची येथून चीनच्या शांघाय बंदराकडे नेण्यात येत हाेते. मुंद्रा पाेर्ट किंवा भारतातील कुठल्याही पाेर्टवर ते अपेक्षित नव्हते. त्यामुळे ते या ठिकाणी कसे आले, याबाबत तपास करण्यात येत आहे.
परदेशी मालवाहू नाैकेतून अनेक कंटेनर्स जप्त करण्यात आले. माहिती न देता धाेकादायक पदार्थांच्या वाहतुकीच्या संशयातून ते जप्त करण्यात आले हाेते. मुंद्रा पाेर्टवर सर्व कंटेनर्स उतरविण्यात आले असून, त्यांचा तपास करण्यात येत आहे.
यापूर्वी ३ हजार किलो ड्रग्स जप्त
nमुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी ३ हजार किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात
आले हाेते. अफगाणिस्तानातून इराणमार्गे ते भारतात पाठवण्यात आले हाेते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली हाेती.
देशाच्या सुरक्षेला आम्ही कायमच प्राधान्य देऊ
आम्ही सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य केले. तत्काळ कारवाईसाठी मदत केली. आम्ही त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो. अदानी समूह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला गंभीरपणे घेतो. त्याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे समूहाने निवेदनात म्हटले आहे.