राेड शाे, रॅलीने प्रचाराची सांगता, जनता काेणाला काैल देणार? ३० नाेव्हेंबरला मतदान, अखेरच्या दिवशी दिग्गजांनी लावला जाेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:29 AM2023-11-29T09:29:00+5:302023-11-29T09:29:27+5:30
Rajasthan Assembly Election 2023: येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेची मुदत मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता संपली. गेले काही आठवडे या राज्यात सत्ताधारी भारत राष्ट्र समिती व काँग्रेस, भाजप या विरोधी पक्षांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे जनमत ढवळून निघाले आहे.
हैदराबाद - येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेची मुदत मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता संपली. गेले काही आठवडे या राज्यात सत्ताधारी भारत राष्ट्र समिती व काँग्रेस, भाजप या विरोधी पक्षांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे जनमत ढवळून निघाले आहे. आता जनता मतदानाद्वारे सत्तेसाठी कोणाला कौल देते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या राज्यातील विद्यमान सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे पुन्हा सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत. तर यावेळी आम्हीच विजयी होणार, असा दावा करत काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरली आहे. भाजपही सर्व शक्तीनिशी या राज्याच्या निवडणुकांत लढत देत आहे.
एआयएमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भारत राष्ट्र समितीला निवडणुकांत मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी केवळ ९ जागांवरच उमेदवार दिले आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबरला असून, त्याचवेळी निकाल जाहीर होतील. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याची निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी घोषणा केली व त्याच दिवशी त्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती.
तेलंगणाचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा
- तेलंगणातील विकासाच्या प्रक्रियेला खीळ पडू नये यासाठी आम्हाला पुन्हा निवडून द्या, असे आवाहन बीआरएसने जनतेला केले, तर मुख्यमंत्री केसीआर यांच्या कारकिर्दीत तेलंगणाचा काहीही विकास झालेला नाही, असा आरोप काँग्रेस व भाजपने केला.
- या राज्याच्या निवडणुकांत भाजपला काहीही स्थान उरलेले नाही. आम्हीच सत्तेत येणार, असा दावा काँग्रेस करत आहे. तर केसीआर व एआयएमआयएमचे साटेलोटे असून, भाजपचीही त्याला साथ आहे, असाही आराेप काँग्रेसने केला आहे.
‘त्या’ जाहिरातींमुळे नियमभंग नाही : काॅंग्रेस
कर्नाटक सरकारने आपल्या कामगिरीबद्दल तेलंगणातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमुळे कोणत्याही नियमाचा भंग झालेला नाही, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. जनतेने काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन या जाहिरातींतून करण्यात आले नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या जाहिरातींसंदर्भात निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारला पत्र पाठविले आहे. त्याला उत्तर देणार असल्याचेही डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
रिंगणात आहेत २,२९० उमेदवार
- तेलंगणामध्ये २,२९० उमेदवार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी, भाजपचे खासदार बंदी संजयकुमार, डी. अरविंद, सोयम बापुराव इत्यादींचा समावेश आहे.
- मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल, कामारेड्डी तर ए. रेवंथ रेड्डी कोंडगल, कामारेड्डी येथून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील तेलंगणामध्ये येऊन सुमारे १२ सभा घेतल्या होत्या.