रेल्वेच्या शौचालयातून पडलेली सोनसाखळी शोधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:41 AM2017-07-31T02:41:19+5:302017-07-31T02:41:26+5:30
रेल्वेने मनात आणले तर त्यांचे प्रशासन कोणत्या थराला जाऊन आणि किती तत्परतेने काम करू शकते याचा सुखद अनुभव महाराष्ट्रातील एका प्रवाशाला काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवले रेल्वे स्थानकावर आला.
नवी दिल्ली : रेल्वेने मनात आणले तर त्यांचे प्रशासन कोणत्या थराला जाऊन आणि किती तत्परतेने काम करू शकते याचा सुखद अनुभव महाराष्ट्रातील एका प्रवाशाला काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवले रेल्वे स्थानकावर आला.
धावत्या रेल्वेगाडीच्या शौचालयातून पडलेली गळयातील सोन्याची चेन येवल्याचे स्टेशन मास्तर अनिल कुमार शर्मा यांनी तीन दिवसांनी शोधून परत केली तेव्हा या प्रवाशाला आश्चर्याचा धक्का बसला.
हाडाचे डॉक्टर असलेले डॉ. चव्हाण-पाटील १६ जुलै रोजी ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ने लोणंदहून मनमाडला चालले होते. गाडी येवले येथे आली तेव्हा डॉ.पाटील शर्ट बदलण्यासाठी शौचालयात गेले. त्यांनी शर्ट काढला तेव्हा त्यासोबत त्यांच्या गळ््यातील सोन्याची चेन निघाली व खाली शौचालयात पडली.
एव्हाना गाडी स्टेशनच्या बाहेर पडली होती. ५० ग्रॅम वजनाची दीड लाख रुपयांची चेन गेल्याने डॉ. पाटील यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. गाडीचा गार्ड कोणी साखळी ओढली हे शोधत आला. डॉ. पाटील यांनी आपण साखळी ओढल्याचे सांगून कारण सांगितले. प्रकरण येवल्याचे स्टेशन मास्तर शर्मा यांच्यापर्यंत गेले.
थोडा वेळ काय करता येईल याच्यावर विचार झाला व शेवटी रेल्वे कर्मचाºयांनी डॉ. पाटील यांना सांगितले की, गाडीला ‘बायो टॉयलेट’ असल्याने येथे काहीच करता येणार नाही. गाडी कोल्हापूरला जाईल तेव्हा तेथील सफाई कर्मचारीच त्या ‘बायो टॉयलेट’ची टाकी सफाईसाठी उघडतील. त्यामुळे कोल्हापूरला गेलात तर तेथे चेन शोधता येईल.
डॉ. पाटील यांनी चेनचा नाद सोडला व ते येवल्याहून सहा तासांचा प्रवास करून फलटणला घरी गेले. घरी घडला प्रकार सांगितल्यावर त्यांच्या ‘टेकसॅवी’ मुलीने प्रकरण हाती घेतले. १८ जुलै रोजी त्यांच्या मुलीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टिष्ट्वट केले व मदतीची विनंती केली. अवघ्या १० मिनिटांत रेल्वेमंत्र्यांनी उत्तराचे टिष्ट्वट केले,‘ संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’!
त्यानंतर अर्ध्या तासात डॉ. पाटील यांना पुणे रेल्वे स्टेशन मास्तरचा फोन आला व त्यांनी चेन कुठे, कशी पडली याची माहिती घेतली. त्यांनी सांगितल्यानुसार डॉ. पाटील दुसºया दिवशी कोल्हापूरला गेले. पण तेथे त्यांना असे कळले की त्या गाडीला ‘बायो टॉयलेट’ नव्हते तर साधा भारतीय पद्धतीचा शौच होता. म्हणजे पडलेली चेन त्या शौचालयाच्या आरपार खाली जाऊन रुळांमध्ये पडली असणार .
ही माहिती येवले येथे स्टेशन मास्तर शर्मा यांना कळविली गेली. शर्मा यांनी कर्मचाºयांना बरोबर घेऊन पाऊस पडत असूनही सुमारे दोन किमी अंतराच्या रेल्वेरुळांमध्ये कसून शोध घेतला. अखेर रुळांमधील खडीतील घाणीतून चेन दिसल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.