राफेलच्या कागदपत्रांची चोरी झालीच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:55 AM2019-03-09T04:55:00+5:302019-03-09T04:55:11+5:30
राफेल व्यवहाराच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाल्याचे न्यायालयात सांगणाऱ्या अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी ती चोरीला गेली नसून, त्यांच्या छायाप्रती काढण्यात आल्या, असे सांगितले.
नवी दिल्ली : राफेल व्यवहाराच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाल्याचे न्यायालयात सांगणाऱ्या अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी ती चोरीला गेली नसून, त्यांच्या छायाप्रती काढण्यात आल्या, असे सांगितले. गोपनीय कागदपत्रांच्या फोटोकॉपी याचिकादारांनी अर्जामध्ये वापरल्या असा मी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी केलेल्या युक्तिवादाचा अर्थ होता असे ते म्हणाले. राफेल कागदपत्रांसंदर्भातील वेणुगोपाल यांच्या युक्तिवादामुळे राजकीय वादळ निर्माण झाले. ही कागदपत्रे चोरीला जाण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना धारेवर धरले, तसेच कारवाईची मागणी केली होती.
सूत्रांनी सांगितले की, वेणुगोपाल यांनी चोरलेली या शब्दाचा वापर करायला नको होता. राफेलच्या कागदपत्रांवर आधारित बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल दै. हिंदूवर कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला होता.