राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 08:00 AM2020-07-28T08:00:55+5:302020-07-28T08:05:52+5:30
राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
चंदीगड: अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाली आहे. ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून उद्या भारतात पोहोचतील. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी अंबाला हवाईतळही राफेल विमानांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे.
राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. तसेच, अंबाला हवाईतळाजवळील ३ किलोमीटरच्या परिसराला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. ३ किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
एकीकडे राफेल विमानांच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळ आधीच सज्ज झाले आहे, तर आता हवाई दल आणि अंबाला प्रशासनाने हवाईतळाच्या ३ किलोमीटरचा परिसर ड्रोन झोन म्हणून घोषित केले आहे. अंबाला येथील हवाईतळवरील बंदोबस्ताची माहिती अंबाला छावणीचे डीएसपी राम कुमार यांनी दिली. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चीन सीमेपासून सुमारे ३०० किमी अंतरावर असलेल्या अंबाला हवाईतळावर ही राफेल विमाने तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे, अंबाला हवाईतळावरही राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने अंबाला हवाईतळासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत.
दरम्यान, दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता व दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी