सत्तेत आल्यास राफेल करारात नक्की दुरुस्ती करणार : पी. चिदम्बरम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:50 AM2019-02-15T00:50:34+5:302019-02-15T00:54:49+5:30
आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले.
नवी दिल्ली : आम्ही सत्तेत आल्यास फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रद्द करणार नाही. मात्र करार अधिक चांगल्या पद्धतीने करुन अधिक राफेल विमाने विकत घेण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या करारातील आॅफसेट पार्टनरचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी विमानांची संख्या, किंमती व विमाने भारतास मिळण्याची मुदत हे मुद्देही अतिशय महत्त्वाचे आहेत.
राफेल प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी हे अन्य कंपनीच्या फायद्यासाठी हे आरोप करीत असल्याची टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आम्ही राफेलचा करार रद्द करणार नाही, असे चिदम्बरम यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फतच व्हायला हवी, अशी आपली भूमिका आहे, असे सांगताना, या प्रश्नावर न्यायालयात जाऊ न काही उपयोग होणार नाही, असे आपले सुरुवातीपासून मत होते, असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. ते म्हणाले की, यूपीएचे सरकार असतानाच राफेल विमाने खरेदी करण्याचे ठरले होते. राफेलची लढाऊ विमाने उत्तम दर्जाची असल्याने ती घेण्याबाबत कोणाचेच दुमत नाही. त्यामुळे करार रद्द करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मात्र करारात दुरुस्ती करून देशाला वेळेत, कमी किमतीत विमाने मिळतील, हे आम्ही नक्कीच पाहू.
राफेल विमान खरेदीविषयीचा कॅगचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात आला. त्यात यूपीए सरकारच्या काळातील करारापेक्षा आता ही विमाने २.८६ टक्क्यांनी स्वस्तात मिळणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र कराराचे उल्लंघटन फ्रान्स सरकार जबाबदार असेल, ही आधीच्या करारातील अट नव्या करारात काढून टाकल्याने जोखीम वाढली असल्याचा उल्लेख कॅगच्या अहवालात आहे.
३६ विमाने अपुरी
हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी १२६ राफेल विमानांची गरज असल्याचे आम्ही सत्तेत असतानाच म्हटले होते. केवळ ३६ विमानांनी भागणार नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यास १२६ विमाने लवकर मिळावीत, यासाठी फ्रान्स व कंपनीशी पुन्हा चर्चा केली जाईल, असेही चिदम्बरम यांनी स्पष्ट केले.