राफेल, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सामर्थ्य वाढणार- हवाई दल प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:20 PM2018-10-08T21:20:09+5:302018-10-08T21:22:06+5:30
विमानांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं
गाजियाबाद: राफेल विमानं आणि एस-400 क्षेपणास्त्रांमुळे हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटलं. हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विमानांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. विमान अपघात कमी व्हावेत, यासाठी हवाई दलाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
आम्ही कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास सज्ज आहोत. राफेल विमान आणि एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. हवाई दलाची विमानं अपघातग्रस्त होत असल्याच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलं. 'सततच्या अपघातांमुळे हवाई दलाचं दुहेरी नुकसान होतं. विमानांच्या अपघातामुळे आर्थिक फटका बसतो. यासोबतच युद्ध काळातील क्षमतेवरदेखील परिणाम होतो,' असं हवाई दल प्रमुख म्हणाले.
विमानांच्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बी. एस. धनोआ यांनी दिली. 'हवाई दलाचे वैमानिक आणि तंत्रज्ञांना अधिकाधिक चांगलं प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मानवी चुका कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं धनोआ म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं.