राफेल विमानांमुळे भारताची सामरिक क्षमता वाढेल, हवाई दलाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:55 PM2018-09-05T16:55:17+5:302018-09-05T17:00:14+5:30
राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून देशातील वातावरण तापले असतानाच भारतीय हवाई दलाने मात्र हा करार अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. राफेलची विमाने दर्जेदार असून, या विमानांमुळे भारताच्या सामरिक क्षमतेत अभूतपूर्व वाढ होणार असल्याचा दावा हवाई दलाने केला आहे. राफेल विमान करारावर टीका करत असलेल्यांनी या विमानांच्या खरेदीसाठी ठरवण्यात मापदंड आणि खरेदी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, असे हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एस.बी. देव यांनी सांगितले.
58 हजार कोटी रुपयांच्या राफेल करारावरून सध्या विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. एअर मार्शल एस. बी. देव म्हणाले, हे एक चांगले विमान आहे. त्याची क्षमता उच्च दर्जाची आहे आणि या विमानाचे उड्डाण करण्याची आम्ही वाट पाहत आहोत . या विमानांमुळे आणीबाणीच्या परिस्थितीत आव्हानाचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेत वाढ होईल, सामरिक क्षमतेत एका कार्यक्रमामध्ये राफेल विमान कराराबाबत विचारणा करण्यात आली असता देव यांनी ही माहिती दिली.
राफेल विमान खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला होता. 2016 साली या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले होते. या करारांतर्गत भारत फ्रान्सकडून 58 हजार कोटी रुपयांमध्ये 36 विमाने खरेदी करणार आहे. मात्र विमानांच्या किमतीमुळे हा करार वादात सापडला आहे.
दरम्यान, राजकारणात गाजणारा राफेल विमान कराराचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. राफेल करार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राफेल डीलमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करत वरिष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीचा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्यानं राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. राफेल कराराबद्दल मोदी देशाशी खोटं बोलले, असा घणाघाती आरोप राहुल यांनी लोकसभेत केला होता.