लोकसभा निवडणुकीतील पराभवाला उमेदवाराकडून न्यायालयात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 10:06 AM2019-07-05T10:06:31+5:302019-07-05T10:07:44+5:30
याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले. दक्षिण दिल्ली मतदार संघात राघव यांनी निवडणूक लढवली असून येथून रमेश बिधूडी यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे. बिधूडी यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. या विरोधात चढ्ढा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले की, एक उमेदवार म्हणून बिधूडी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याचा आरोप चढ्ढा यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्यासमोर आज होणार आहे. तसेच बिधूडी यांना विजयी घोषीत केल्याचा निर्णय अमान्य करून दुसऱ्या स्थानी असलेल्या चढ्ढा यांना विजयी घोषीत करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली. तसेच बिधूडी यांनी स्वत:ची आणि पत्नीच्या उत्पन्नाची खोटी माहिती सादर केली असून निवडणूक प्रचारात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवून राजधानीतील लोकांना फसविल्याचा आरोप करण्यात आला आहे.