रघुराम राजन RBI गर्व्हनरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत
By Admin | Published: June 18, 2016 05:22 PM2016-06-18T17:22:34+5:302016-06-18T17:51:20+5:30
रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवण्यास नकार दिला आहे. आरबीआय कर्मचा-यांना उद्देशून त्यांनी पत्र लिहील आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर म्हणून दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआय कर्मचा-यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा गर्व्हनर बनणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत.
सप्टेंबर २०१३ मध्ये मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा २३ वा गर्व्हनर म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी चलनाची घसरण सुरु होती. महागाई वाढलेली होती आणि विकास खुंटला होता. त्यावेळी मी महागाई कमी करण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवला होता. आपण जे ठरवले होते रिझर्व्ह बँक म्हणून आपण त्यानुसार काम केल्याचा मला अभिमान वाटत आहे असे राजन यांनी पत्रात म्हटले आहे.
रघुराम राजन गर्व्हनरपदी रहाणार की, जाणार यावरुन माध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आरबीआय गर्व्हनर म्हणून आपली जबाबदारी चोख बजावताना त्यांनी वेळोवेळी सरकारचे कान टोचले. त्यावरुन सरकार आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पत्रकारांनी पंतप्रधान मोदींना रघुराम राजन यांना मुदतवाढ देण्यासंबंधी थेट प्रश्न विचारला होता. त्यावर मोदींनी प्रशासकीय निर्णय सरकारलाच घेऊं दे असे उत्तर दिले होते. खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तर रघुराम राजन यांच्यावर तिखट शब्दात टीका करताना त्यांना पदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या काळात राजन यांची नियुक्ती झाली होती.