मोदी सरकारमध्ये मंत्र्यांपेक्षा नोकरशहांना जास्त अधिकार- राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:11 AM2019-01-25T10:11:12+5:302019-01-25T10:20:52+5:30
नोकरशहांकडून सुधारणांमध्ये खोडा घालण्याचं काम- रघुराम राजन
दावोस: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील नोकरशाहांवर कडाडून टीका केली आहे. आर्थिक सुधारणा अपयशी ठरण्यात नोकरशहांचा फार मोठा हात आहे, अशा शब्दांमध्ये राजन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बरसले. नोकरशहांमुळे आर्थिक सुधारणांचा गाडा पुढे जाण्यात अडथळे येतात, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फार अधिकार नाहीत. त्या तुलनेत नोकरशहांच्या हातात जास्त अधिकार असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. राजन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दावोसमध्ये मुलाखत दिली. दावोसमध्ये सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू आहे.
सरकारी बँकांच्या खासगीकरणाबद्दल राजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी नोकरशाह आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली. 'सरकारी बँकांमधील हस्तक्षेप थांबायला हवा. कोणत्याही नोकरशहापेक्षा एखाद्या पात्र व्यक्तीकडे बँकांचं नेतृत्त्व सोपवायला हवं. बँक चालवण्यासाठी नोकरशहा पर्याय असू शकत नाही. बँकांची धुरा योग्य व्यक्तींकडेच द्यायला हवी,' असं परखड मत राजन यांनी व्यक्त केलं.
राजन यांनी रिझर्व्ह बँकेतील त्यांचा अनुभवदेखील यावेळी सांगितला. 'गव्हर्नर म्हणून काम करताना अनेक प्रकारचे नोकरशहा भेटले. त्यामुळे वेगवेगळे अनुभव आले. या काळात काही चांगले अनेक अधिकारी भेटले. तर अनेक अधिकारी असेही होते, ज्यांना सुधारणांसाठी केलेले प्रयत्न समस्या वाटायचे,' असा अनुभव राजन यांनी बोलून दाखवला. सध्याच्या देशात मंत्र्यांची भूमिका नोकरशहा पार पाडत आहेत. खरंतर मंत्र्यांनी नोकरशहांना आदेश द्यायला हवेत. मात्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्यांऐवजी नोकशहा सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.