रघुवर दास यांचे सत्तारोहण
By admin | Published: December 29, 2014 04:13 AM2014-12-29T04:13:54+5:302014-12-29T04:13:54+5:30
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी
रांची : भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे खराब हवामानामुळे दास यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत़ दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, अनेक व्हीआयपी या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाहीत़
येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर दास यांचा शपथविधी सोहळा पार पडला़ त्यांच्यासोबत नीलकंठ सिंग मुंडा, चंद्रशेखर प्रसाद सिंग, लुईस मरांडी (सर्व भाजपा)आणि चंद्रप्रकाश चौधरी (आॅल झारखंड स्टुडंट युनियन) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली़
मोदी आणि अमित शहा यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा, जयंत सिन्हा, सुदर्शन भगत आदी उपस्थित होते़
आदिवासीबहुल झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणारे दास हे पहिले बिगर आदिवासी नेते आहेत़ रघुवर दास यांनी यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-आजसू युतीने ८१ पैकी ४२ जागांवर विजय संपादित करून बहुमत प्राप्त केले आहे. दास हे झारखंडचे दहावे मुख्यमंत्री आहेत़ बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा यांच्यानंतर ते झारखंडमध्ये भाजपाचे तिसरे मुख्यमंत्री ठरले़ (वृत्तसंस्था)