यूपीमध्ये लवकरच राहुल-अखिलेशच्या प्रचाराची दंगल?
By admin | Published: January 11, 2017 11:05 AM2017-01-11T11:05:30+5:302017-01-11T11:10:51+5:30
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या युतीसंदर्भातील घोषणा आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या युतीसंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र या आठवड्याच्या अखेरपर्यंत दोन्ही पक्ष संयुक्तरित्या निवडणुकीचा प्रचार करायला सुरुवात करतील, असे संकेत काँग्रेस आणि सपाकडून मंगळवारी मिळाले आहेत.
प्रचार रॅलीमध्ये अखिलेश यादव, डिंपल यादव यांच्यासोबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमधील युतीसंदर्भातील घोषणा प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये सक्रीय होणार असल्याचे संकेत यावरुन मिळत आहे.
दरम्यान, समाजवादी पार्टीमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईमुळे काँग्रेस आणि सपाची युती जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची माहिती मिळते आहे. कारण समाजवादी पक्ष आणि त्याचे चिन्ह सायकलवर अखिलेश यांचा अधिकार आहे की नाही, ही बाब आधी निश्चित व्हावी, असे अखिलेश यांचे म्हणणे आहे. सध्या हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला असून 13 जानेवारी रोजी यावर निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यांच्या बाजूनं निर्णय आल्यास, त्याच दिवशी काँग्रेससोबतच्या युतीबाबत घोषणा केली जाणार आहे. मात्र, काँग्रेससोबत युती व्हावी, यावर अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांचे एकमत होऊ शकलेले नाही. काँग्रेसमुळे निवडणुकीत मदत होईल, शिवाय 300 हून अधिक जागांवर विजय मिळवता येईल, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. मात्र निवडणुकांमध्ये काँग्रेसची मदत होईल, असे मुलायम सिंह यांना जराही वाटत नाही.