राहुल व शहांचा झंझावाती प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 03:51 AM2018-05-01T03:51:24+5:302018-05-01T03:51:24+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकात विजय मिळवायचाच या इर्षेने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना झपाटले आहे. अमित शाह व राहुल गांधी हे असे पहिले पक्षाध्यक्ष आहेत
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकात विजय मिळवायचाच या इर्षेने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना झपाटले आहे. अमित शाह व राहुल गांधी हे असे पहिले पक्षाध्यक्ष आहेत, ज्यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणुकांसाठी एखाद्या राज्याचे सर्व जिल्हे पिंजून काढले असतील.
निवडणुकांच्या व्यूहरचनेचे काम पक्षाध्यक्ष करतात, असा अनुभव आहे. मात्र कर्नाटकात राहुल गांधी व अमित शहा कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीत. राहुल गांधी यांनी आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला भेट दिली असून, त्यासाठी साडेतीन हजार किमीचा प्रवास केला. दौऱ्यात त्यांनी दोन डझन मंदिरे व मठांना भेटी दिल्या.
सामान्य माणसाशी
नाळ जोडण्याचा प्रयत्न
राहुल यांनी प्रचारात पक्षश्रेष्ठी म्हणून न वावरता आपल्यापेक्षा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सभांमध्ये अधिक महत्व दिले. मंदिरातील पुजाºयांना वंदन करणे, फेरीवाल्याकडून काकडी विकत घेणे, गाडी थांबवून रस्त्यात लहान मुलांना जवळ घेणे, मेट्रो तिकिटासाठी रांगेत उभे राहाणे, प्रवाशांना आपल्यासह सेल्फी काढण्यास संमती देणे, टपरीवर चहा पिणे यातून राहुल यांनी सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांचे
मनोबल वाढविण्यावर भर
भाजपाध्यक्ष अमित शहा हेही आक्रमकपणे प्रचार करीत आहेत. त्यांनीही सर्व जिल्ह्यांना भेटी दिल्या व ठिकठिकाणी प्रचारयात्रा काढल्या. या दौºयांत पक्षाच्या लहान कार्यकर्त्यांशी तसेच व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध गटांतील लोकांशी शहा यांनी सविस्तर
चर्चा केली आणि त्यांची मते
जाणून घेतली. राज्यातील परिस्थितीबाबत स्थानिक नेत्यांच्या माहितीवर विसंबून न राहाता स्वत:च्या स्रोतांकडून माहिती मिळवून शहा यांनी तिकीटवाटप व इतर काही निर्णय घेतले. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, यावर त्यांचा भर आहे.