राहुल बजाज होणार अध्यक्षपदावरून पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:25 PM2020-07-21T22:25:23+5:302020-07-21T22:25:30+5:30
१९८७ मध्ये बजाज फायनान्सची स्थापना झाल्यापासून राहुल बजाज हे या कंपनीचे नेतृत्व करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची मोठी भरभराट झाली आहे.
नवी दिल्ली : बजाज फायनान्स या कंपनीचे सुमारे तीन दशके नेतृत्व केल्यानंतर ख्यातनाम उद्योगपती राहुल बजाज हे येत्या ३१ तारखेला या कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांची जागा कंपनीचे सध्याचे उपाध्यक्ष संजीव बजाज हे घेणार आहेत.
१९८७ मध्ये बजाज फायनान्सची स्थापना झाल्यापासून राहुल बजाज हे या कंपनीचे नेतृत्व करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची मोठी भरभराट झाली आहे. येत्या ३१ जुलैपासून कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम थांबविण्याचा निर्णय राहुल बजाज यांनी घेतला असून, कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे नवीन अकार्यकारी अध्यक्ष म्हणून संजीव बजाज यांची १ आॅगस्टपासून नियुक्ती केली आहे. कंपनीने शेअर बाजाराला याबाबतची माहिती दिली आहे. राहुल बजाज यांनी कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम थांबविण्याचा निर्णय घेतला असला तरी यापुढेही ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह नॉन इनडेपेंडंट डायरेक्टर म्हणून काम बघत राहतील.
राहुल बजाज यांनी गेली ५ दशके बजाज उद्योग समूहाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि मुख्यत: दूरदृष्टीच्या नियोजनामुळे बजाज उद्योग समूहाने प्रगतीचे अनेक नवीन टप्पे ओलांडले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कंपनीला आपला दर्जा आणि पत हे दोन्ही राखणे शक्य झाल्याचे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.