काँग्रेसमध्ये 'देशभक्ती'पेक्षा 'राहुलभक्ती' जास्त - भाजपा
By admin | Published: October 7, 2016 05:06 PM2016-10-07T17:06:12+5:302016-10-07T17:09:00+5:30
काँग्रेसमध्ये राहुलभक्ती देशभक्तीवर भारी पडत असल्याचा टोला भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी लगावला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केल्याचा काँग्रसेच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपानेही पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये राहुलभक्ती देशभक्तीवर भारी पडत असल्याचा टोला भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. जर राहुल गांधी यांचं वक्तव्य लाजिरवाणं होतं तर काँग्रेसची पत्रकार परिषद लाजिरवाणेपणाची हद्द होती अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.
जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं हे ऐकून फार दुख: झालं. नेमकं काँग्रेसला काय म्हणायचं आहे ? काँग्रेसच्या या वक्तव्याचा सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो आयएसआयला झाला असेल असं रवीशंकर प्रसाद बोलले आहेत. कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंह यांनी खूप बोलावं, कारण ते जितकं बोलतात आमची मतं तितकीच वाढतात असा टोलाही रवीशंकर प्रसाद यांनी लगावला.
राहुल गांधींचा बचाव करुन काँग्रेसला कोणता संदेश द्यायचा आहे असा सवालही विचारण्यात आला. काँग्रेसचे आरोप निराधार, दुर्भाग्यपूर्ण आहेत. आपल्या नेत्याचा बचाव करताना काँग्रेस एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं. सर्जिकल स्ट्राईकचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण युद्द आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये फरक असतो हे काँग्रेसला कळायला हवं असंही रवीशंकर प्रसाद बोलले आहेत.