राहुल गांधी अयोध्येत
By admin | Published: September 10, 2016 03:59 AM2016-09-10T03:59:34+5:302016-09-10T03:59:34+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्या येथील हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले.
अयोध्या : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्या येथील हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले. १९९२ मध्ये वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्यानंतर अयोध्येला भेट देणारे नेहरू-गांधी कुटुंबाचे ते पहिले सदस्य आहेत. राहुल गांधी यांची उत्तरप्रदेशात किसान यात्रा सुरू आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी त्यांनी हनुमानगढी मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी महंद ग्यानदास यांची भेट घेतली. ग्यानदास विश्व हिंदु परिषदेचे कडवे विरोधक मानले जातात.
सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. त्हनुमान गढी अयोध्येतील वादग्रस्त भागापासून एक किलोमीटरवर आहे. १९८९मध्ये राममंदिरासाठी जेथे भूमिपूजन करण्यात आले होते त्या ठिकाणापासूनही राहुल दूर राहिले.
२६ वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी १९९० च्या आपल्या सद्भावना यात्रेदरम्यान हनुमानगढी मंदिरात दर्शन घेण्याची योजना आखली होती. मात्र, काही कारणांमुळे ते मंदिरात येऊ शकले नव्हते. राजीव गांधी यांची २१ मे १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हा राहुल २० वर्षांचे होते. (वृत्तसंस्था)
>आशीर्वाद घेण्यासाठी आले होते राहुल
राहुल यांनी महंत ग्यानदास यांच्याशी बंदद्वार चर्चा केली नंतर महंत ग्यानदास म्हणाले की, राहुल आम्हा लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. नेत्याने साधू-संतांकडे जावे ही काही मोठी गोष्ट नाही. कोणी आशीर्वाद घ्यायला येतो तर त्याची काही ना काही अपेक्षा तर असतेच. आशीर्वाद मागणाऱ्याचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येते.