बहुचर्चित सुटी संपवून राहुल गांधी परतले
By admin | Published: April 16, 2015 11:52 PM2015-04-16T23:52:29+5:302015-04-16T23:52:29+5:30
संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत.
तर्कवितर्कांना पूर्णविराम : ‘किसान रॅली’ला संबोधण्याची शक्यता; ५६ दिवसांचे ‘आत्मचिंतन’
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत. संसद अधिवेशन सुरू होत असतानाच त्यांनी सुटी घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते. काँग्रेसला लागोपाठ पराभवाचे धक्के पचवावे लागल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले होते. राहुल यांच्या ठावठिकाण्याबाबत कमालीचे मौन बाळगले जात असतानाच परतण्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
४४ वर्षीय राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानाने दिल्लीला परतताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. गडद रंगाचा शर्ट परिधान केलेले राहुल गांधी गाडीच्या मागच्या सीटवर बसले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घातला होता. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना ते प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती; मात्र ते काहीही न बोलताच थेट निवासस्थानी पोहोचले.
लवकरच अमेठीला भेट
येत्या दोन दिवसांत राहुल अमेठी या आपल्या मतदारसंघाला भेट देतील अशी शक्यता आहे. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अमेठीत लागल्यानंतर सोनिया यांनी २८ मार्च रोजी तेथे भेट देऊन राहुल गांधी लवकरच परतणार असल्याचे आश्वासन दिले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची रॅली आयोजित केली असून त्या मुहूर्तावर त्यांचे आगमन झाल्यामुळे ते जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी चर्चा करतील, त्यावेळी १९ एप्रिलच्या रॅलीची योजना ठरेल.
राहुल गांधी यांचे विमान सकाळी १०.३५ वाजता लँड होणार अशी ब्रेकिंग न्यूज झळकत होती. त्यांचे विमान किमान ४० मिनिटे उशिरा उतरले. ११.१५ वाजता आगमन होताच ते थेट आपल्या वाहनाकडे गेले. त्यांची कार १२, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचली तेव्हा माता सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका तेथे त्यांच्या प्रतीक्षेत होत्या.
राहुल गांधी यांनी दोन तास आपल्या निवासस्थानी घालविल्यानंतर १०, जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले. ते लवकरच आपले कामकाज नेहमीप्रमाणे सुरू करतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधी पूर्ण जोमाने व कटिबद्धतेने नेतृत्व देतील. पक्षाच्या वाटचालीसाठी ठोस पावले उचलतील, असा विश्वास काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी व्यक्त केला.
भाजपची टीका
स्वत: राहुल व काँग्रेसही भविष्याबाबत संभ्रमित आहेत. ते नेहमीच चुकीच्या कारणांनी चर्चेत आहेत. राजकारणात राहायचे की नाही ते जनतेला सांगावे, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.