पदयात्रेतून राहुल गांधी काँग्रेसला देणार नवसंजीवनी ?
By admin | Published: April 27, 2015 10:07 AM2015-04-27T10:07:49+5:302015-04-27T10:11:42+5:30
लोकसभेत आक्रमक पवित्रा घेत सर्वांना धक्का देणारे राहुल गांधी आता पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - ५६ दिवसांच्या प्रदीर्घ रजेनंतर राजकारणात परतलेल्या राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असतानाच आता पदयात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. भूसंपादन विधेयकाविरोधात राहुल गांधी देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढणार असून या माध्यमातून काँग्रेसचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भूसंपादन विधेयकावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून प्रदीर्घ रजेवरुन परत आलेल्या राहुल गांधींनी लोकसभेत फटकेबाजी करत सत्ताधा-यांना दणका दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आगामी काळात पदयात्रा काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पदयात्रेत राहुल गांधी प्रामुख्याने भूसंपादन विधेयकावर भर देतील. ग्रामीण भागात काँग्रेसचा जनाधार घटला असून भूसंपादन विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत. याशिवाय शहरीभागातील कामगार व तरुण वर्गांशीही राहुल गांधी संवाद साधतील. मोदी सरकार सत्तेत आल्यावरही रोजगाराच्या अपेक्षीत संधी निर्माण होत नसल्याने तरुण वर्ग निराश झाला आहे. तर कामगार कायद्यातील बदलांमुळे हा वर्गही दुखावला आहे. राहुल गांधी पदयात्रेतून या वर्गाशीही संवाद साधतील.
इंदिरा गांधी यांनी १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तर राजीव गांधी यांनी १९८९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पदयात्रा काढून काँग्रेसला पुन्हा विजय मिळवून दिला होता. राहुल गांधी या इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतील का याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.