परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

By admin | Published: May 27, 2017 11:03 AM2017-05-27T11:03:30+5:302017-05-27T11:03:30+5:30

जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

Rahul Gandhi left for Saharanpur even after the permission was denied | परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

Next

 ऑनलाइन लोकमत 

सहारनपूर, दि. 27 - जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधींची दंगल पीडितांबरोबर भेट होईल कि, नाही ते सांगत येत नाही. त्यांना प्रशासकीय अडथळयांचा सामना करावा लागेल. तरी काय होते ते पाहूया असे राहुल गांधींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
सहारनपूरमध्ये सध्या इंटरनेट आणि मोबाईल मेसेंजिग अॅप बंद करण्यात आले आहेत. अफवां पसरुन हिंसाचार होऊ नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
 
सहारनपूरमध्ये सध्या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरु आहे. 40 दिवसापूर्वीच या वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात जाण्यास शुक्रवारी मज्जाव करण्यात आला. सहारनपूरमध्ये जातीय हिंसाचारात दोन जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पीडितांना भेटण्यासाठी राहुल सहारनपूरला जाऊ इच्छित होते. 
 
राहुल यांना सहारनपूरला येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले. कुमार हे येथील नवे पोलीस अधीक्षक असून, सुभाष चंद्र दुबे यांच्या ठिकाणी ते आले आहेत. सहारनपूर येथील जातीय हिंसाचार आणि संघर्षाच्या दृष्टिकोनातून दुबे यांना २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
 
राहुल यांचा शनिवारी शब्बीरपूर गावाला भेटीचा कार्यक्रम होता. या गावात ५ मे रोजी दलितांची घरे पेटविण्यात आली होती. बसपाप्रमुख मायावती यांनी सहारनपूरला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. त्यांनी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे. सहारनपूरमध्ये या महिन्यात अनेकदा जातीय संघर्ष पाहावयास मिळाला. 
४० दिवसांपूर्वी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायात संघर्षाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून सतत हिंसक घटना घडत आहेत. पाच मे रोजी दोन समुदायातील संघर्षात एक ठार, तर अन्य १५ जखमी झाले. नऊ मे रोजी संतप्त जमावाने डझनभर पोलीस वाहने पेटवून देऊन १२ पोलिसांना जखमी केले. २३ मे रोजी आणखी एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना जखमी करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्य सरकारकडून अहवाल मागवून सहारनपूरला केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या पाठविल्या आहेत.
सहारनपूर येथील जातीय हिंसाचाराच्या घटनांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनंतर सुनावणी करता येऊ शकते.
तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे एल. नागेश्वर राव आणि नवीन सिन्हा यांच्या सुटीकालीन पीठाने सांगितले. गौरव यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायिक हस्तक्षेपाची गरज आहे. न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, असे यादव यांनी म्हटले होते. यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुटीकालीन पीठाने या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचे म्हटले.

Web Title: Rahul Gandhi left for Saharanpur even after the permission was denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.