राहुल गांधी स्वगृही परतले
By admin | Published: April 16, 2015 12:49 PM2015-04-16T12:49:34+5:302015-04-16T12:55:52+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे. राहुल गांधी गेेले ५६ दिवस अज्ञातवासात होते. आज दुपारी थाई एअरवेजच्या विमानाने ते दिल्लीत परतले आहेत.
२३ फेब्रुवारीरोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. सुट्टी घेऊन राहुल गांधी नेमके कुठे गेले याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तसेच सुट्टीचे कारणही उघड झालेले नाही. राहुल गांधींचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होते व यावरुन काही नेत्यांचे राहुल गांधींसोबत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत राहुल गांधी विचारमंथनासाठी सुट्टीवर गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानेच दांडी मारल्याने विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली होती.
तब्बल ५६ दिवस अज्ञातवासात काढल्यावर राहुल गांधी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले. थाई एअरवेजच्या बँकॉक - दिल्ली विमानाने त्यांनी दिल्ली गाठले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रोड येथील निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. राहुल गांधी परतल्याचे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत फटाके फोडून जल्लोष केला. आज संध्याकाळी काँग्रेसचे काही नेते राहुल गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे.
१९ एप्रिल रोजी दिल्लीत रामलीला मैदानात भूसंपादन कायद्याविरोधात आयोजित मोर्चात राहुल गांधी शेतक-यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे विचारमंथन करुन आल्यावर राहुल गांधी लगेचच राजकारणा सक्रीय होतील असे दिसते.