स्वार्थासाठी नितीश कुमार जातीयवादी शक्तींसोबत गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:18 AM2017-07-28T03:18:53+5:302017-07-28T03:19:12+5:30
भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला.
नवी दिल्ली : भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला. आपल्या स्वार्थी राजकीय हेतूसाठी नितीश कुमार हे जातीयवादी शक्तींकडे परत गेले असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले की, हे राजकारण तीन ते चार महिन्यांपासून शिजत होते, याची आपल्याला कल्पना होती. बिहारच्या ज्या आघाडीमधून जनता दल युनायटेड पक्ष बाहेर पडला आहे त्या आघाडीचा काँग्रेस पक्ष एक घटक होता. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी जातीयवादी शक्तींविरुद्धच्या लढाईत आमच्यासोबत हात मिळविला होता. पण ज्यांच्याविरुद्ध ते लढले आहेत त्यांच्यासोबतच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे. भारताच्या राजकारणातील हीच मोठी समस्या आहे.
बिहारमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात लोकांच्या मनात काय चालू आहे याची कल्पना असते. मला हे माहीत होते की, नितीश कुमार अशी काही
तरी योजना आखत आहेत. मागील तीन-चार महिन्यांपासून हे राजकारण सुरू होते. लोक आपल्या स्वार्थी हेतूसाठी काहीही करू शकतात. कोणतेही तत्त्व, विश्वसनीयता राहिली नाही. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात.
नितीश कुमार यांचे बदलते राजकारण त्यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, असे मत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, याबाबत मी अधिक भाष्य करणार नाही. पण नितीश कुमार यांची सतत बदलत जाणारी भूमिका त्यांच्यासाठीच चांगली नाही.
संसदेतही भाजपाला पाठिंबा - त्यागी
पाटणा : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त जनता दल यापुढे भाजपाला पाठिंबा देईल, अशी घोषणा गुरुवारी त्या पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी केली. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत बोलताना के. सी. त्यागी म्हणाले की, काँगे्रस पक्ष भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाही.
काँग्रेसवर विश्वास ठेवणे ही मोठी चूक होती. मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व यावर निर्णय घेईल. ते म्हणाले की, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये हा फरक आहे की, नितीश कुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करत नाहीत तर राहुल गांधी याबाबत तडजोड करतात.