राहुल गांधी यांची अध्यक्ष होण्यास ना नाही
By admin | Published: September 21, 2016 07:38 AM2016-09-21T07:38:15+5:302016-09-21T07:38:15+5:30
माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते;
हमीरपूर : माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते; परंतु तो निर्णय तिलाच घ्यायचा आहे, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे मांडले.
उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसच्या लागोपाठ पराभवांमुळे प्रियांका यांनी राजकारणात उतरावे यासाठी दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना छेडले असता हा निर्णय सर्वस्वी प्रियांकाला घ्यायचा असल्याचे त्यांनी म्हटले. हैदराबाद : काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास राहुल गांधी यांची ना नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी मंगळवारी येथे सांगितले. प्रियांका गांधी यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी सक्रिय राजकारणात उतरावे, असे बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. तथापि, त्यांना तसे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
पक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्यास त्यांची (राहुल) ना नाही. ते कधी स्वीकारायचे एवढाच काय तो मुद्दा आहे. त्यांना त्यांची वेळ ठरवू द्यावी. राजकारणात वेळ-काळ खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे नेतृत्वाला आपली वेळ ठरवू द्या, असे ते म्हणाले.
प्रियांका गांधींबाबत बोलायचे झाल्यास त्या आतापर्यंत राजकारणात नाहीत. त्यांना राजकारणात येण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. हा त्यांचा स्वत:चा निर्णय असून आम्ही त्याचा आदर करायला हवा. त्यांनी राजकारणात उतरावे, अशी बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना असून, त्यात गैर काही नाही; परंतु राजकारणात कधी यायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, आपण नाही ठरवू शकत, असेही त्यांनी नमूद केले.
यावर्षीच्या प्रारंभी चार राज्यांत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी काँग्रेसला मोठय़ा शस्त्रक्रियेची गरज असल्याचे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता दिग्विजयसिंह म्हणाले की, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांत पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. आपले विधान योग्य होते. तथापि, नंतर काँग्रेस अध्यक्षा आजारी पडल्या. बदल होतील यात शंका नाही. हे बदल कधी करायचे याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना घ्यायचा आहे.
पक्ष संघटनेत दीर्घकाळापासून बदल झालेले नाहीत. बदल व्हावेत, असे प्रत्येकाला वाटते. याबाबत काँग्रेस अध्यक्षांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला वाटते त्या गतीने पक्षात बदल होत नसल्यामुळे तुम्ही निराश आहात काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात निराशा नसते. प्रत्येकाला कठीण परिस्थितीत जगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. राजकारणात जसा चांगला काळ असतो, तसा वाईट काळही असतो. त्यामुळे आम्ही प्रतिकूलतेला संधीत रूपांतरित केले पाहिजे, असेही त्यांनी बोलून दाखवले. (वृत्तसंस्था)