संसदेत गैरहजर असतानाच्या काळात राहुल गांधींनी पगार घेऊ नये - RSS
By Admin | Published: October 6, 2015 05:42 PM2015-10-06T17:42:49+5:302015-10-07T09:27:48+5:30
संसदेच्या बजेटच्या अधिवेशनात तब्बल ५६ दिवस गैरहजर राहिलेल्या राहूल गांधींनी या काळात संपूर्ण पगार व भत्ते कसे काय घेतले अशी राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने केली आहे.
ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. ५ - संसदेच्या बजेटच्या अधिवेशनात तब्बल ५६ दिवस गैरहजर राहिलेल्या राहूल गांधींनी या काळात संपूर्ण पगार व भत्ते कसे काय घेतले अशी विचारणा राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने केली आहे. अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पुरावे समोर असून त्याआधारे हा दावा करण्यात आल्याचेही मॅगेझिनने स्पष्ट केले आहे.
राहूल गांधी अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशन काळात उपस्थित तर राहिलेच नाहीत, शिवाय ते नक्की कुठे आहेत याचा थांगपत्ताही त्यांच्या मतदारांना व देशाला नसल्याचे ऑर्गनायझरने म्हटले आहे. Missing असं नाव दिलेला राहूल गांधींचा फोटो ऑर्गनायझरने वापरला असून, त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचा दावाही या लेखात पार्लमेंट अॅक्टचा संदर्भ देत करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसने या लेखाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचेही अनेक नेते अशा प्रकारे वागत असल्याचे सांगताना, मनीष तिवारी यांनी आपण एकदा भत्ता नाकारला असता, भाजपाने आपली संभावना स्टंट अशी केली होती याची आठवण करून दिली. तर भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने या लेखात गैर काय आहे असा प्रतिप्रश्न केला आहे.
मात्र, यामधून आता लढाई केवळ काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी नसून राहूल गांधी व RSS एकमेकांवर शरसंधान करत असल्याचे दिसून येत आहे.