राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ; काँग्रेसचे प्रत्युत्तर, अदानी प्रकरण केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 05:45 AM2023-03-14T05:45:53+5:302023-03-14T05:46:16+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांमध्ये भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचा आरोप केल्यावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधींच्या ब्रिटनमधील वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने चढविलेल्या हल्ल्याला काँग्रेसने सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. जे लोक भारतीय लोकशाहीला चिरडत आहेत, तेच तिला वाचविण्याच्या बाता करीत आहेत, असा घणाघात काँग्रेसने केला. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी वरिष्ठ मंत्र्यांनी केली.
राहुल गांधींनी माफी मागावी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली, तर विरोधकांनी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी रेटली. दोन्ही बाजूंकडील उलटसुलट घोषणाबाजीमुळे गदारोळ झाला.
लोकशाहीला चिरडणारेच ती वाचविण्याच्या बाता करताहेत
जे लोक भारतीय लोकशाहीला चिरडत आहेत, तेच तिला वाचविण्याच्या बाता करीत आहेत, असा घणाघात काँग्रेसने केला. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना संसदेचे कामकाज चालू द्यायचे नाही, असा आरोप या प्रमुख विरोधी पक्षाने केला.
‘उलटा चोर कोतवाल को डांटे‘
सरकारला टोला लगावताना काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ ही म्हण त्यांना लागू होते, असे म्हटले. पंतप्रधान मोदी हे ‘हुकूमशहा’प्रमाणे सरकार चालवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याच्या मागणीवर विरोधकांची एकजूट असून, ही एकजूट ते कायम ठेवतील, असेही ते म्हणाले.
सरकारला घेरले
अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याच्या रणनीतीवर काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चा केली. तपास यंत्रणांचा दुरुपयोग, अदानी प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"