राहुल गांधी अजून अपरिपक्व - शीला दीक्षित

By admin | Published: February 24, 2017 08:58 AM2017-02-24T08:58:25+5:302017-02-24T12:04:25+5:30

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत असे विधान केले आहे की ज्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

Rahul Gandhi is still immature - Sheila Dikshit | राहुल गांधी अजून अपरिपक्व - शीला दीक्षित

राहुल गांधी अजून अपरिपक्व - शीला दीक्षित

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत असे विधान केले आहे की ज्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या तुफान चर्चा सुरू आहे. 
 
'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अजूनही अपरिपक्व आहेत. त्यांना आणखी थोडा वेळ दिला पाहिजे' असे दीक्षित यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. 
 
उत्तर प्रदेशात सपासोबत झालेल्या युतीबाबत शीला दीक्षित यांनी सांगितले की, 'सपा-काँग्रेसमध्ये झालेल्या युतीसंदर्भात त्यांना कोणतीही समस्या नाही. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणास्तव मी प्रचार करू शकले नाही. सध्या सर्वत्र बदलाचे वारे फिरत आहेत. आताच्या पिढीसोबत राजकारणातही बदल होत आहेत. गेल्या काही वर्षांत राजकारणाच्या भाषेतही बराच बदल पाहायला मिळत आहे. काँग्रेस या सर्व बदलांसोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे'. 
 
बदलाचा संदर्भ देत शीला दीक्षित यांनी राहुल गांधींवर टीका करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केलेले नाही तर याद्वारे त्यांनी एक प्रकारे राहुल यांचे समर्थन केले आहे. 'राहुल गांधी अजून परिपक्व नाहीत. ते आताच्या पिढीतील आहेत. वयानुसार त्यांच्याकडून परिपक्व होण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही'. 
 
राहुल गांधींची स्तुती करत शीला यांनी पुढे असेही म्हटले की, 'काँग्रेस उपाध्यक्षांना आणखी थोडा वेळ द्यायला हवा. आधीच्या तुलनेत त्यांच्यात बराच बदल पाहायला मिळत आहे. राजकारणात ते बरंच काही शिकले आहेत. ते  बैठकांमध्ये सहभागी होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरागसपणे आपल्या मनातील गोष्ट ते मांडतात. काँग्रेसला गरीब आणि वंचितांचा विकास करायचा आहे. राहुल एकमेव व्यक्ती आहेत जे शेतक-यांचा विचार करतात आणि त्यांच्याबाबत बोलतात'. 
 
दरम्यान, उत्तर प्रदेशातील सपा-काँग्रेसच्या युतीचा प्रचार न करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न दिल्याने मी निवडणुकीचा प्रचार केला नाही, असे बोलणे अयोग्य आहे. मला कानपूर आणि वाराणसीत प्रचारसभा घ्यायच्या होत्या. मात्र माझी तब्येत मला साथ देत नाही, त्यामुळे प्रचारात सहभागी होऊ शकले नाही. सपा-काँग्रेसच्या युतीचे स्वागत केले पाहिजे. अखिलेश यांची प्रतिमा अन्य नेत्यांपेक्षा चांगली असून जनता त्यांना पसंतदेखील करते. 
 
शीला यांनी पुढे असेही म्हटले की, मायावतींमध्ये अखिलेश यांच्याप्रमाणे शैली नाही आणि भाजपाकडे राज्यात कोणता चेहरा नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा अनेकवेळा दौरा केला आहे, मात्र ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. हे आपणा सर्वांना माहिती आहे'.
 
दरम्यान, सपा-काँग्रेस युतीमुळे मुस्लिम समुदायाचेही समर्थन मिळेल, शिवाय यादवदेखील युतीसोबत आहे. तसेच राहुल आणि अखिलेश एकत्र प्रचार करत असल्याने त्याचा चांगला प्रभाव पडेल, असा विश्वासही शीला दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Rahul Gandhi is still immature - Sheila Dikshit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.