बँकांच्या कामकाजातील ढवळाढवळ बंद करा, अन्यथा... RBIच्या कर्मचारी युनियनचा केंद्राला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:00 AM2018-10-30T10:00:08+5:302018-10-30T14:26:25+5:30
रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचारी युनियननंही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी बँकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच आरबीआयच्या कामकाजात सरकारनं हस्तक्षेप करणं थांबवावं, असंही पत्रात म्हटलं आहे.
जर तुम्ही आरबीआयच्या कामातील ढवळाढवळ बंद केली नाही, तर त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहा, असा इशाराच आरबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दिला आहे. सरकारकडून बँकांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचवला जातोय, असाही या पत्रात उल्लेख आहे. आरबीआयचे उपगव्हर्नर विरल आचार्य यांनीही कर्मचारी संघटनेच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. ज्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं आहे. आरबीआय संघटनेच्या विधानानंतर राहुल गांधींनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल केंद्रीय बँकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
भारत देश हा भाजपा आणि आरएसएसला सरकारी संस्थांवर कब्जा करू देणार नाही, याचा मला विश्वास असल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. खरं तर उशिरा का होईल पण पटेल आरबीआयला वाचवण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पटेल आरबीआयला 'मिस्टर 56' पासून वाचवू इच्छितात. भाजपा आणि आरएसएस भारतातील संस्थांवर कब्जा करू शकत नाहीत, असं ट्विट करत राहुल गांधी म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि केंद्र सरकारमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. ऊर्जित पटेलांचे अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारबरोबर मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोदी सरकारला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे.
Nice that Mr Patel is finally defending the #RBI from Mr 56. Better late then never. India will never allow the BJP/ RSS to capture our institutions.https://t.co/pdpIPRJvFs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2018