राहुल गांधींनी शेतक-यांची जागा लाटली - स्मृती इराणींचा हल्लाबोल
By admin | Published: August 23, 2015 03:48 PM2015-08-23T15:48:13+5:302015-08-23T15:48:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे शेतकरीविरोधी असून त्यांनीच सायकल कारखान्यासाठी दिलेली जागा लाटल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अमेठी, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे शेतकरीविरोधी असून त्यांनीच सायकल कारखान्यासाठी दिलेली जागा लाटल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. या मुद्द्यावर राहुल गांधींनी खुली चर्चा करावी असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना आव्हान देणा-या स्मृती इराणींनी रविवारी अमेठीचा दौरा केला. काँग्रेसचा गड समजल्या जाणा-या अमेठीत स्मृती इराणींनी थेट राहुल गांधींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर राहुल गांधी खोटे आहेत अशी बोचरी टीका करत इराणी म्हणाल्या, अमेठीत सम्राट सायकल कारखान्यासाठी दिलेली ६५ एकरची जागा राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने कवडीमोल किंमतीमध्ये विकत घेतली. यासंदर्भातील काही कागदपत्रंही त्यांनी उपस्थितांसमोर सादर केली. राहुल गांधींनी मोदींवर टीका करण्याऐवजी अमेठीतील वीज, पाणी, शिक्षण व रोजगाराच्या समस्येकडे लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला. जोपर्यंत अमेठीतून गांधी कुटुंबाची विदाई होत नाही तोपर्यंत अमेठीचा विकास अशक्य आहे असेही त्यांनी नमूद केले.