राहुल गांधी यांनी घेतली आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट
By admin | Published: June 8, 2017 09:02 PM2017-06-08T21:02:40+5:302017-06-08T21:02:40+5:30
मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भेट
Next
>ऑनलाइन लोकमत
मंदासोर (मध्य प्रदेश), दि. 8 - मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भेट घेतली. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांना आज सकाळी अटक करण्यात आले होते. मात्र त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला. अखेर पीडितांना भेटण्यास परवानगी देल्यानंतर त्यांनी जामीन घेण्यास तयारी दर्शवली होती.
पीडित शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना शहीद दर्जा मिळावा, अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, तसेच पीडितांना संपूर्ण मदत करू." या देशात केवळ 50 श्रीमंतांचेच कर्ज माफ होते, शेतकऱ्यांचे नाही, असे सांगत राहुल यांनी यावेळी मोदी सरकारला टोला लगावला.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाल्यानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच काल राहुल गांधींनी पीडित शेतकऱ्यांची भेट घेण्याची घोषणा केल्यानंतर तणावात अधिकच भर पडली होती. मात्र राहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये आल्यावर त्यांना वाटेतच रोखून अटक करण्यात आली होती. अखेर पीडितांना भेटण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांनी जामीन घेत मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर पीडितांची भेट घेतली.
महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला होता. या प्रकऱणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.