राहुल गांधींना हवी ममतांशी युती

By admin | Published: November 30, 2015 02:44 AM2015-11-30T02:44:12+5:302015-11-30T02:44:12+5:30

बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत.

Rahul Gandhi wants alliance with Mamta | राहुल गांधींना हवी ममतांशी युती

राहुल गांधींना हवी ममतांशी युती

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प. बंगालमध्ये भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी युती करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी ममतांशी थेट संपर्क
साधत युतीची शक्यता पडताळली आहे.राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी आपापल्या विशेष विमानाने अनुक्रमे दिल्ली आणि कोलकात्याला परतत असताना पाटणा विमानतळावरच त्यांच्यात अनौपचारिक चर्चेची पहिली फेरी पार पडली. हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी एकत्र आले असतानाचा हा प्रसंग आहे. स्वत: राहुल गांधी ममता बॅनर्जी यांच्याकडे गेले. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. नेमके कोणत्या  मुद्यावर बोलणे झाले ते कळू शकले नाही.
शपथविधी कार्यक्रमाच्यावेळी हे दोघे व्यासपीठावर एकत्र आले मात्र त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व देण्यात आले नव्हते. प. बंगालमध्ये ५५ ते ६५ जागा लढण्यावर काँग्रेस समाधान मानेल. २९४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे ४० आमदार असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष
२५ जागांवर दुसऱ्या स्थानी राहिला होता.
ममतांनाही आश्चर्याचा धक्का....
तृणमूल काँग्रेसला अधिक जागा देण्याची तयारीही राहुल गांधी यांनी दर्शविल्यामुळे ममता बॅनर्जी यांना आश्चर्याचा धक्का बसला. पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केल्यानंतर या विषयावर पुन्हा बोलण्याचे आश्वासन ममतांनी यावेळी राहुल गांधी यांना दिल्याचे समजते. त्या दिल्लीत ७ डिसेंबर रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित राहणार असून प. बंगालमधील विविध प्रकल्पांसाठी पैसा खेचून आणण्यासाठी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठीचाही त्यांचा उद्देश असेल. मोदी सरकारला लोकसभेत ३३ तर राज्यसभेत ११ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
येचुरींशी हातमिळवणी नाही !
राहुल गांधी यांचे सीताराम येचुरी यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध आहेत, मात्र काँग्रेस येचुरी यांच्या माकपशी युती करण्याची शक्यता नाही. केरळमध्ये मे २०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुका माकप आणि काँग्रेस परस्परांविरुद्ध लढणार आहेत. ते पाहता या दोहोंमध्ये प. बंगालमध्ये युती होणार नाही. राहुल गांधी यांनी एकतर्फी ममता बॅनर्जींकडे युतीचा हात समोर करण्यात मोठे डावपेच मानले जातात. संसदेत आणि बाहेर त्यांनी भाजपला साथ देऊ नये, हा उद्देशही त्यामागे आहे. काँग्रेसचा ढासळता आधार पाहता राहुल गांधी यांना ममतांची मदत हवी आहे.

Web Title: Rahul Gandhi wants alliance with Mamta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.