काम कसं करायचं राहुल गांधींनी सोनियांकडून शिकावं - शीला दीक्षित
By admin | Published: April 28, 2017 11:46 AM2017-04-28T11:46:16+5:302017-04-28T11:48:31+5:30
राहुल गांधींनी आपला सल्ला ऐकल्यास पुन्हा एकदा काँग्रेस मुख्यालयाला पुर्वीसारखी झळाळी येईल असा विश्वास शीला दीक्षित यांनी व्यक्त केला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हाती लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रं पडण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी असलेले राहुल गांधी यांच्यात नेतृत्वगुण आहे, मात्र त्यांनी पक्ष कार्यकर्त्यासाठी सहज उपलब्ध राहिलं पाहिजे असं मत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी व्यक्त केलं आहे. एनडीटीव्हीच्या वॉक द टॉकमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
यावेळी बोलताना शीला दीक्षित यांनी सोनिया गांधींचं उदाहरण दिलं. त्यांनी सागितलं की, "सोनिया गांधी यांनी 19 वर्षापुर्वी जेव्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली तेव्हा रोज सकाळी दोन ते तीन तास त्या पक्ष मुख्यालयात वेळ घालवायच्या. राहुल गांधी यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तसंच केलं पाहिजे. राहुल गांधींनी आपला सल्ला ऐकल्यास पुन्हा एकदा काँग्रेस मुख्यालयाला पुर्वीसारखी झळाळी येईल असा विश्वास शीला दीक्षित यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस मुख्यालय उजाड पडलं आहे.
शीला दीक्षित यांनी याआधीदेखील राहुल गांधींबद्दल आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. "काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अजूनही अपरिपक्व आहेत. त्यांना आणखी थोडा वेळ दिला पाहिजे" असं शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते.