राहुल गांधी आज शेतकऱ्यांना भेटणार
By admin | Published: April 18, 2015 12:16 AM2015-04-18T00:16:33+5:302015-04-18T00:16:33+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना भेटून वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
नवी दिल्ली : ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना भेटून वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
मोदी सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याच्या निषेधार्थ येत्या रविवारी काँग्रेसने ‘किसान रॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीच्या एक दिवस आधी राहुल शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे समजून घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांना राहुल भेटतील. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि दिग्विजयसिंह त्यांच्या सोबत असतील. २०११ मध्ये भट्टा परसौल गावातून राहुल यांनी शेतकऱ्यांच्या बळजबरीच्या भूसंपादनाविरोधात पदयात्रा काढली होती. या गावातील एक शिष्टमंडळही राहुल यांना भेटले. राहुल यांच्या याच पदयात्रेनंतर तत्कालीन संपुआ सरकारने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा-२०१३ संमत केला होता.
रविवारच्या ‘किसान रॅली’स काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल दोघेही संबोधित करणार असल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे.
५७ दिवसांच्या सुटीनंतर राहुल गांधी सक्रिय राजकारणात परतल्याची घोषणा, तसेच पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात या रॅलीकडे बघितले जात आहे. एफएम रेडिओवरून काँग्रेसने या रॅलीचा प्रचार चालवला आहे.