Lokmat Parliamentary Awards: राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत : सुप्रिया श्रीनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 10:39 AM2023-03-18T10:39:44+5:302023-03-18T10:39:58+5:30
वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला.
राहुल गांधी यांच्या इंग्लंडमधील वक्तव्यावरून भाजपने जाणीवपूर्वक वादळ उठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विदेशात भारताबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. माेदी बाेलतात ती लाेकशाही असेल, तर मग राहुल बाेलतात ती बदनामी कशी, असा सवाल करीत भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या साेशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत.
वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधानांच्या संबंधित वक्तव्यांची क्लिपच ऐकविली. राहुल गांधी कॅम्ब्रिज किंवा इंग्लंडमध्ये काहीही चुकीचे बोललेले नाहीत. जागतिक मंचावर भारतीय लाेकशाहीचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या व्यक्तीने माफी का मागावी, असा सवाल करत राहुल कधीच माफी मागणार नाहीत, असे श्रीनेत यांनी स्पष्ट केले. देशात सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले हाेतात, कारागृहात टाकले जाते, पर्यावरणावर बाेलणाऱ्यांवर कारवाई होते, तेव्हा भारताची लाेकशाही जिवंत राहते काय, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला. लाेकसभेत सत्तापक्षच संसदेचे कामकाज रोखत असल्याचे याआधी पाहिले का? ‘गोली मारो...’सारखे प्रक्षाेभक विधान करणाऱ्या अनुराग ठाकूर यांना मंत्रिपदाची भेट दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राहुल यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे. द्वेषाचा चष्मा लावलेल्यांना ते दिसत नाही. भारत जाेडाे यात्रा ही तपस्या आहे. राजकीय लाभापेक्षा प्रेम, बंधुभाव वाढविण्यासाठी निघालेल्या या यात्रेचे दृश्य अद्भुत हाेते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"