राहुल गांधी विधान मागे घेणार नाहीत
By admin | Published: August 25, 2016 04:53 AM2016-08-25T04:53:18+5:302016-08-25T04:53:18+5:30
महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मागे घेणार नाहीत.
शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मागे घेणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, अर्जात राहुल गांधी यांनी आपल्या म्हणण्यावर कायम आहेत. राहुल गांधी यांनी भिवंडीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्हे, तर संघटनेच्या विचारांना गांधींचे मारेकरी ठरविले, हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यास सिब्बल यशस्वी ठरले, हे त्यांच्या देहबोलीवरून दिसले. हे प्रकरण पुढे सुरू ठेवायचे की, फेटाळून लावायचे, याचा निर्णय न्यायालय १ सप्टेंबर रोजी घेईल.
तिकडे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपा राजकीय लाभासाठी काँग्रेस विधान बदलत असल्याचा खोटाच प्रचार करीत असल्याचे म्हटले. राहुल गांधी यांनी संघाबद्दल जे काही म्हटले, त्याला ऐतिहासिक वस्तुस्थितीचा आधार आहे. त्यामुळे विधान मागे घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे सुरजेवाला म्हणाले. २०१४ मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या या खटल्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन, तो रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. कपिल सिब्बल म्हणाले की, ‘नथुराम गोडसे हा संघाचा सदस्य नव्हता, हे लालकृष्ण अडवाणी यांचे म्हणणे नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसे याने फेटाळून लावले होते. गोपाळ गोडसेने स्पष्टपणे म्हटले होते की, माझ्यासह आम्ही तिघेही भाऊ (त्यात नथुराम गोडसेही आला) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होतो.’
>१९४८चे टिपण
चार फेब्रुवारी १९४८ चे तत्कालीन सरकारचे टिपण कपिल सिब्बल यांनी जाहीर केले. त्यात म्हटले होते की, ‘संघाचे लोक गंभीर प्रकारच्या कारवायांमध्ये (दरोडे, लूट) गुंतलेले आहेत.’ त्यांनी नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये संघाच्या भूमिकेवरून झालेल्या पत्रव्यवहाराचाही खुलासा केला. सिब्बल म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून महात्मा गांधींची हत्या आणि संघाची भूमिका याची चर्चा होत आली आहे. अनेक पुस्तकेही आहेत, परंतु कधी कोणता विरोध समोर आलेला नाही.’