राहुल गांधींना धक्का, अमेठीतील पेपर मिल येणार 'रत्नागिरी'त
By admin | Published: December 10, 2015 09:41 AM2015-12-10T09:41:48+5:302015-12-10T14:14:18+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रस्तावित पपरमिल आता महाराष्ट्रातील रत्नागिरीत येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रातून काँग्रेसचे सरकार गेल्याचा परिणाम आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील विकास योजनांवरही झाल्याचे स्पष्ट दिसत असून फूडपार्क नंतर आता अमेठीने पेपर मिलही गमावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गांधी कुटुंबाला सरकारकडून हा आणखी एक धक्का बसला आहे. अमेठीतील प्रस्तावित ३ हाजर ६५० कोटींची पेपर मिल आता महाराट्रातील रत्नागिरीमध्ये हलवण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याने यासंदर्भात हालचाल सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करेल.
'आम्ही याप्रकरणी अर्थ मंत्रालय तसेच इतर मंत्रालयांनाही पत्रं लिहीली आहेत, त्या खात्यांच्या सल्ल्यानंतर संबंधित प्रस्ताव आम्ही कॅबिनेटसमोर मांडू', असे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले.
यापूर्वी ही पेपर मिल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये सुरू होणार होती, त्यासाठी अमेठीतील जगदीशपूरची निवडही करण्यात आली होती. मात्र ही मिल महाराष्ट्रात लावण्यात यावी अशी मागणी अनंत गीते यांनी केल्यानंतर अखेर हा कारखाना रत्नागिरीत उभा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामुळे सुमारे ९०० लोकांना रोजगार मिळणार आहे.
पेपर मिलपूर्वी अमेठीतील जगदीशपूरमध्ये फूड पार्कचा प्रस्ताव होता, मात्र अखेर तोही रद्द करण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडून मोदी सरकार राजकीय बदला घेत असल्याचा आरोपही केला होता.