राहुल गांधी यांच्याकडे लवकरच पक्षाची धुरा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2016 01:15 AM2016-01-03T01:15:59+5:302016-01-03T01:15:59+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच पक्षाचे अध्यक्ष होतील, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. राहुल हे सध्या सुट्यांसाठी युरोपला गेले असून पुढील आठवड्यात तेथून
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच पक्षाचे अध्यक्ष होतील, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. राहुल हे सध्या सुट्यांसाठी युरोपला गेले असून पुढील आठवड्यात तेथून परतल्यानंतर लगेच ते पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या २७ डिसेंबरला राहुल गांधी यांनी स्वत: टिष्ट्वट करून आपण सुट्यांसाठी युरोप दौऱ्यावर जात असल्याचे जाहीर केले होते. आपल्या विदेश दौऱ्याबाबतची माहिती त्यांनी प्रथमच सार्वजनिक केली होती. ८ जानेवारीच्या जवळपास राहुल गांधी परतणार असून त्यानंतर लगेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. याच बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना वेग येईल आणि राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होईल, असे संकेत आहेत. दरम्यान पक्ष सूत्रांकडून संकेत प्राप्त झाले असले तरी काँग्रेसतर्फे अद्याप राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांच्यासह काही पक्षनेत्यांनी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली पाहिजे असे मत मांडले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही हीच इच्छा आहे. परंतु यासंदर्भातील कुठलाही निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीच घेऊ शकतात,असे पक्षसूत्रांनी नामोल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले.