भाजपा, आरएसएसच्या लोकांनीच केला हल्ला - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:50 PM2017-08-05T23:50:37+5:302017-08-05T23:50:42+5:30
गुजरातमध्ये आपल्या वाहनांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला त्यामागे भाजप आणि आरएसएसचे लोक आहेत, असा आरोप शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये आपल्या वाहनांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला त्यामागे भाजप आणि आरएसएसचे लोक आहेत, असा आरोप शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात धनेरा भागात झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जयेश दर्जी उर्फ अनिल राठोड या व्यक्तीला अटक केली आहे. काँग्रेस नेत्यांनी असा दावा केला आहे की, जयेश हा भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सचिव आहे.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखविले. या हल्ल्यात राहुलयांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.
याबाबत राहुल गांधी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या दिशेने एक मोठा दगड मारला. तो माझ्या सुरक्षा अधिकाºयाला लागला. मोदी आणि आरएसएस यांची राजकारण करण्याची ही पद्धत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने या हल्ल्याचा निषेध केला नाही, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की,असे प्रकार करणारे स्वत:च त्याचा निषेध कसा काय करतील?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा हल्ला म्हणजे ‘पूर्वनियोजित षड्यंत्र’ असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला. मल्लिकार्जुन खरगे, आनंद शर्मा, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत गुलाम नबी आझाद यांनी या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, अशा घटना राहुल यांना लोकांना भेटण्यापासून रोखू शकत नाहीत. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. दीड किलो वजनाची ही वीट राहुल गांधी यांना लक्ष्य करूनच मारली होती. कारच्या समोरच्या खिडकीची काच उघडी होती.
आझाद म्हणाले की, निवडणुका तोंडावर आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की, त्यांनी एसपीजी सुरक्षा असलेल्या व्यक्तींना पूर्ण सुरक्षा द्यायला हवी. कारण संसदेच्या कायद्यानुसार ते सर्वाधिक सुरक्षा असणारे व्यक्ती आहेत. जर असे पुन्हा घडले तर मला असे वाटते की, देशातील नागरिक हे सहन करू शकणार नाहीत. राहुल गांधी यांनी राज्य सरकारने देऊ केलेली बुलेटप्रूफ कार का स्वीकारली नाही? असा प्रश्न केला असता आझाद म्हणाले की, काही वेळा जनतेप्रती संवेदनशील असल्याकारणाने गैरबुलेट कार घ्यावी लागते.
त्यांची हीच विचारधारा आहे
- मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जे काही होत आहे ते लोकशाही आणि देशासाठी चांगले नाही. जर लोक संकटात असतील तर त्यांना भेटणे काही गुन्हा नाही. लोकांना भेटणाºया लोकांसोबत अशा प्रकारची वर्तणूक योग्य नाही.
आनंद शर्मा म्हणाले की, यातून भाजपचा हेतू, विचारधारा आणि चरित्र समजते. जे आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध हिंसाचार, धमकी आणि शारीरिक स्वरुपाच्या हल्ल्यावर विश्वास करतात. भाजप प्रत्येक ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे.
सुरजेवाला म्हणाले, पक्षाची ही मागणी आहे की, तक्रारीत ज्या चार लोकांचा उल्लेख केला आहे त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.पण, कठपुतळी बनलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आमचे कार्यकर्ते रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून होते. मुख्यमंत्री विजय रुपानी आणि त्यांच्या सरकारचे हे पूर्ण अपयश आहे.