राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
By admin | Published: March 3, 2016 05:05 AM2016-03-03T05:05:49+5:302016-03-03T05:05:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनांचे मायाजाल तयार करून निवडणुका जिंकून दाखवल्या खऱ्या, पण आता या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णयांबद्दल जनता सवाल निर्माण करू लागली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी काळा पैसा पांढरा करण्याची जी योजना सादर केली, त्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, ही मोदींची फेअर अॅण्ड लवली योजना आहे. काळा पैसा असलेल्यांना तुरुंगात पाठवू, असे मोदी सांगतात. पण फेअर अॅण्ड लवली योजनेद्वारे त्यांनी काळ्या पैसेवाल्यांना सुटकेचा मार्गही दाखवला आहे, अशी टीका करून ते म्हणाले की, आम्ही सत्तेत येताच सारे काही स्वस्त करू, असे आश्वासन मोदी देत होते. पण यूपीए सत्तेत असताना ७0 रुपये किलो असलेली तूरडाळ आज २00 रुपयांवर गेली आहे. याला आश्वासनपूर्ती म्हणायचे की काय, असा सवाल करत, दोन वर्षांत तुमच्या सरकारने किती जणांना रोजगार मिळवून दिला, याचा जाब द्या, असे आव्हानच पंतप्रधानांना दिले. आमच्याकडे महात्मा गांधी आहेत, तुमच्याकडे सावरकर आहेत, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, तर तुम्ही हिंसेवर, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढताच भाजप सदस्यांनी उभे राहून गोंधळ सुरू केला. शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार अशा सर्वांवर हल्ले होत असताना पंतप्रधान गप्प बसून राहल्याबद्दलही गांधी यांनी आक्षेप घेतला. मोदी आजतागायत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान म्हणजे देश आणि देश म्हणजे पंतप्रधान असे कोणी समजू नये, असा टोला लगावून राहुल गांधी म्हणाले की राष्ट्रवाद आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आम्ही तिरंग्याला सलाम करतो, तेव्हा त्या कापडाला नव्हे, तर राष्ट्राला, राष्ट्रीय विचारांनाच सलाम करतो. जनता आणि राष्ट्र यांच्यात असलेले नात्यावर शंका घेउ नका, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानातील शासकांनी आपल्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याचे नाटक केले. पण त्या शासकांचे जनतेशी असलेले नाते तुटून गेले. त्यामुळे आज आपण पाकिस्तान आणि बांगला देश असे दोन देश झाल्याचे पाहत आहोत. जनेतचे एकमेकांशी असलेले नाते जात, भाषा, प्रांत, धर्म अशा मुद्द्यांवर न तोडण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. अर्थात तसे आम्ही होउच देणार नाही, असा दावा करताना ते म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तानची कंबर ६ वर्षांत मोडून दाखवली होती. जगापासून पाकिस्तानला आम्ही व एकटे पाडले होते. पण मोदी मात्र ठरले नसतानाही चहा प्यायला पाकिस्तानात गेले. परिणाम काय, तर पठाणकोटमध्ये हल्ला झाला. यूपीएने सहा वर्षांत जे करून दाखवले ते मोदी यांच्या पाक भेटीमुळे बिघडून गेले, अशी जळजळीत टीकाही राहुल गांधी यांनी केली.