सरकारच्या अपयशाकडे राहुल गांधी यांचे लक्ष
By admin | Published: May 25, 2016 01:00 AM2016-05-25T01:00:13+5:302016-05-25T01:00:13+5:30
सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
सत्ता गेली असली तरी आपला जनाधार भक्कम आणि मोठा आहे, हा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेस पक्षाचा दावा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरलेला दिसत नाही. काँग्रेसचा हा तर्क पक्षाचे वरिष्ठ नेते खोडून काढताना दिसत आहेत.
अशाप्रकारचा तर्क देणारे काँग्रेस नेते अखेर कोणत्या भ्रमात कायम राहू इच्छितात? हे नेते आपले पद सुरक्षित राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘चापलुसी’ तर करीत नाहीत ना? आम्ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, अशी टिप्पणी काँग्रेसच्या एका माजी सरचिटणीसाने खासगीत केली. सध्या पक्षश्रेष्ठी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्ष मुख्यालयात बसलेल्या नेत्यांना हटवून त्यांच्या जागी नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने पक्षातील एकमेकांविरुद्धचा संघर्ष तीव्र झाला आहे.
दरम्यान उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी काही नेत्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासोबत चर्चा करून दिल्लीतील पाणी आणि विजेच्या प्रश्नावर २८ मे रोजी महारॅली आयोजित करण्याचे ठरविले आहे. या रॅलीनंतर लगेच लोकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी महागाईच्या मुद्यावरून देशभरात आंदोलन छेडण्याची काँग्रेसची तयारी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकड्यांचा खेळ मांडून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष भाजपापेक्षा पुढेच राहिलेला आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्या पचनी पडलेला नाही. परंतु त्यांनी अद्याप आपली याबाबतची नापसंती जाहीर केलेली नाही. तथापि याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात यावा, असे निर्देश मात्र त्यांनी दिलेले आहेत. तसेच मोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयाबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देशही राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. मोदी सरकारच्या या अपयशाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी देशभरात जिल्हा आणि राज्यस्तरावर आंदोलन छेडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
अपयशाचा लेखाजोखा
मोदी सरकारचे दोन वर्षांतील अपयश व खराब कामगिरीवर लक्ष केंद्रित करून त्याबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी पक्षनेत्यांना दिले आहेत. आश्वासने पाळण्यात व देशाचा विकास करण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा लेखाजोखा काँग्रेसतर्फे जारी केला जाईल.