राहुल गांधींची सुट्टीची वेळ चुकलीच - दिग्विजय सिंह
By Admin | Published: February 24, 2015 10:26 AM2015-02-24T10:26:22+5:302015-02-24T10:27:28+5:30
राहुल गांधी यांना सुट्टीसाठी योग्य वेळ वेळ निवडता आली असती असे सूचक विधान करत दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेस नेते आणि राहुल गांधींचे कट्टर समर्थक दिग्विजय सिंह यांनीदेखील सुट्टीवरुन काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राहुल गांधी यांना सुट्टीसाठी योग्य वेळ वेळ निवडता आली असती असे सूचक विधान करत दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यात भर म्हणजे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या अधिवेशनात पक्षाच्या उपाध्यक्षानेच सुट्टीवर जाणे अयोग्य असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे राहुल गांधीच्या सुट्टीविषयी भाष्य केले. दिग्विजय म्हणतात, पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी सुट्टीवर जात असतील तर यात गैर काहीच नाही. फक्त या सुट्टीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून राहुल गांधी यांच्या सुट्टीवर टीका केली. राहुल गांधी यांच्या सुट्टीने देशाला काहीच फरक पडत नाही. पण पक्षाच्या भावी अध्यक्षाने महत्त्वाच्या वेळी सुट्टीवर जाऊन पक्ष, देशहित आणि संसदीय कामकाजात किती निष्काळजी आहोत हेच जनतेला दाखवून दिले असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.