ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल गांधींना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 11:07 AM2016-03-14T11:07:39+5:302016-03-14T11:55:04+5:30
ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून संसदेच्या शिस्तपालन समितीतर्फे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाच्या मुद्यावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. या मुद्यावरून संसदेच्या शिस्तपालन समितीतर्फे राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ब्रिटीश नागरिकत्वाबाबत विचारणा करण्यात आली आहे.
अखेर लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीतर्फे राहुल गांधी यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली. ' तुम्ही स्वत:ला कधी ब्रिटीश नागरिक म्हटले होते का?' असा सवाल त्यांना विचारण्यात आला आहे. या समितीचे सदस्य अर्जुन राम मेघवाल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ' या प्रकरणी राहुल गांधींकडून उत्तर आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे भारतासोबतच ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता, त्यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. ब्रिटीश कंपनीतील कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिक असल्याचा उल्लेख केल्याचे स्वामी यांनी म्हटले होते. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर दिल्लीतील भाजपा नेते महेश गिरी यांनीही जानेवारी महिन्यात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली होती.
मात्र काँग्रेसने स्वामींच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत हे आरोप फेटाळून लावले होते. राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक दाखवले जाणे ही टायपिंगमधील चूक असू शकते असे स्पष्टीकरण युरोपी महासंघाच्या कंपनी हाऊस विभागातर्फे देण्यात आले होते. कंपनी विभागात माहिती देणा-या व्यक्तीने ही चुक केली असावी. आम्ही सर्व कागदपत्र सादर झाली की नाही, त्यावर स्वाक्षरी आहे की नाही याची तपासणी करतो. पण त्या कागदपत्रांची सत्यता पडताळणे आम्हाला शक्य नाही असे कंपनी विभागातील अधिका-यांनी सांगितले होते.