कोर्टात माघार घेण्यास राहुल गांधी यांचा नकार

By admin | Published: September 2, 2016 06:28 AM2016-09-02T06:28:18+5:302016-09-02T06:28:18+5:30

महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने

Rahul Gandhi's refusal to step down in court | कोर्टात माघार घेण्यास राहुल गांधी यांचा नकार

कोर्टात माघार घेण्यास राहुल गांधी यांचा नकार

Next

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने संघवाल्यांनी गांधीजींची हत्या केली या विधानाबद्दल त्यांना भिवंडीच्या न्यायालयात बदनामी खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.
सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील एका प्रचारसभेत केलेल्या भाषणाबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश महादेव कुंटे यांनी राहुल गांधींविरुद्ध बदनामीचा खटला गुदरला आहे. तो रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १० मार्च रोजी नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली.
न्या. दीपक मिश्रा आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उभयपक्षी समेटाने हे प्रकरण मिटविता येईल का, हे आजमावून पाहण्याची सूचना केली होती. गेल्या तारखेला (२४ आॅगस्ट) राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले होते की, संघाने महात्मा गांधींची हत्या केली असे राहुल गांधींनी कधीही म्हटले नव्हते. गांधींची हत्या करणारे संघाशी संबंधित होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी आपली भूमिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केली होती. आजही त्यांची तिच भूमिका ठाम आहे व ते त्यातील कोणतेही विधान मागे घेणार नाहीत.
त्यावेळी न्यायालयाने यावर कुंटे यांचे काय म्हणणे आहे ते कळविण्यास त्यांच्या वकिलांना सांगितले होते. गुरुवारी कुंटे यांची भूमिका मांडताना त्यांचे ज्येष्ठ वकील उमेश लळित यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या हत्येशी रा. स्व. संघाशी कोणताही संबंध नाही, असे राहुल गांधी लिहून देणार असतील तर बदनामीची ही फिर्याद मागे घेण्यावर विचार केला जाऊ शकेल.
गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा अल्पसंख्यांची मते हवी असतात तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्यावतीने लळित यांनी मांडले.
राहुल गांधी यांच्यावतीने सिब्बल यांनी असे करण्यास नकार दिला व राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात जी भूमिका घेतली होती त्यावरच ते ठाम असल्याचे सांगितले.
आपल्या छोटेखानी आदेशात दोन्ही पक्षांच्या भूमिका संक्षेपाने नोंदवून खंडपीठाने असे नमूद केले की, खटला रद्द न करण्याच्या उच्च न्यायावलयाच्या निकालात हस्तक्षेप न करण्याचे मत आम्ही व्यक्त केले तेव्हा सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावतीने विशेष अनुमती याचिका मागे घेऊ देण्याची विनंती केली. त्यामुळे ही याचिका मागे घेतल्याने फेटाळण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

गैरहजेरीची सूट नाही
- या बदनामी खटल्याच्या तारखांना भिवंडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे जातीने हजर राहण्यातून राहुल गांधी यांना सूट द्यावी, अशी तोंडी विनंती सिब्बल यांनी केली.
ती खंडपीठाने अमान्य केली व त्यासाठी गांधी यांनी भिवंडी न्यायालयात अर्ज करावा, असे सांगितले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशी सूट मिळाली नव्हती तेव्हा राहुल गांधी एका तारखेला भिवंडी न्यायालयात हजर राहिले होते.

- हा खटला दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी दंड विधानातील बदनामीसंबंधीच्या कलम ४९९ व ५००च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी याचिकाही केली होती. तीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

आम्हाला लेखी द्यावे... गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे, तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा जेव्हा अल्पसंख्यकांची मते हवी असतात तेव्हा तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्या वतीने लळित यांनी मांडले. मात्र असे करण्यास राहुल गांधी यांच्या वतीने सिब्बल यांनी नकार दिला

खटल्याची सुनावणी का टाळली?
राहुल गांधी सातत्याने ‘यू टर्न’ घेत असून, ते सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत का? जर राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम होते तर त्यांनी दोन वर्षे खटल्याची सुनावणी विविध कारणांमुळे का टाळली, असा प्रश्न संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख
डॉ. मनमोहन वैद्य यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याच हिंंदूने महात्मा गांधी यांची हत्या केली नसती. खरेतर, आता रा. स्व. संघाने गोडसे हा खरा हिंदू होता की नव्हता हेच स्पष्ट करून सांगावे.
- कपिल सिब्बल, काँग्रेस

Web Title: Rahul Gandhi's refusal to step down in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.