राहुल गांधींच्या सुरक्षारक्षकांनी वैमानिकाकडे मागितलं लायसन्स
By admin | Published: September 17, 2016 10:15 AM2016-09-17T10:15:11+5:302016-09-17T10:32:21+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीहून वाराणसीला घेऊन जाणा-या इंडिगो विमानाच्या वैमानिकांकडे उड्डाण घेण्याआधी परवाना दाखवण्याची मागणी करण्यात आली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीहून वाराणसीला घेऊन जाणा-या इंडिगो विमानाच्या वैमानिकांकडे उड्डाण घेण्याआधी परवाना दाखवण्याची मागणी करण्यात आली. राहुल गांधींच्या विशेष सुरक्षा टीमने ही मागणी केली होती. ही मागणी ऐकून वैमानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या इंधन दर्जाचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. ही घटना 14 सप्टेंबरची आहे जेव्हा राहुल गांधी सकाळी 8.55 च्या विमानाने दिल्लीहून वाराणसीला चालले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी 6E 308 विमानाच्या वैमानिकांकडे परवाना दाखवण्याची मागणी केली.
सुरक्षारक्षकांनी जेव्हा वैमानिकांकडे परवान्याची मागणी केली तेव्हा आम्हाला धक्काच बसला असं एका क्रू मेम्बरने सांगितलं आहे. वैमानिकांनीही सुरक्षारक्षकांची मागणी फेटाळली. तुम्हाला कागदपत्र मागण्याचा अधिकार नाही सांगत आम्हाला याबाबत एअरलाइन्सशी बोलावं लागेल असं सांगितलं. डीसीजीएकडून विमानाची तपासणी सुरु असल्याने इंधन तपासणीची मागणी पुर्ण करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे विमानाला तब्बल 45 मिनिटं उशीर झाला. इंधनची तपासणी झाल्यानंतरच विमानाने उड्डाण केलं.
इंडिगोने सुरक्षारक्षकांकडून करण्यात आलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 'आम्ही याबाबतीत काहीच बोलू शकत नाही. मात्र अशा प्रकारची मागणी पहिल्यांदाच करण्यात आली. विशेष व्हीआयपी विमानांना काही प्रोटोकॉल असतो. अशावेळी एअर इंडिया किंवा हवाई दलाच्या अनुभवी वैमानिकांवर जबाबदारी सोपवली जाते,' असं इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. मात्र या घटनेमुळे एअरलाइन्स कंपन्या आश्चर्य व्यक्त करत आहेत.