राहुल गांधींनी घेतली शेतक-यांची भेट
By admin | Published: April 18, 2015 12:31 PM2015-04-18T12:31:17+5:302015-04-18T12:37:46+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांची भेट घेऊन वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - 'आत्मचिंतन' सुटी संपवून मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध राज्यांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांची भेट घेऊन वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबतचे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशातील शेतक-यांनी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शेतक-यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, त्यानंतर निवासस्थानाबाहेर येऊन त्यांनी सर्व शेतक-यांशी संवाद साधला.
मोदी सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याच्या निषेधार्थ येत्या रविवारी काँग्रेसने ‘किसान रॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीच्या एक दिवस आधी राहुल यांनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे समजून घेतले. या‘किसान रॅली’त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल दोघेही संबोधित करणार आहेत. ५७ दिवसांच्या सुटीनंतर राहुल गांधी सक्रिय राजकारणात परतल्याची घोषणा, तसेच पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाच्या रूपात या रॅलीकडे बघितले जात आहे.