राहुल - प्रियंकामध्ये मतभेद निर्माण करण्याचा डाव - बेनीप्रसाद
By admin | Published: July 15, 2014 01:37 PM2014-07-15T13:37:33+5:302014-07-15T13:37:33+5:30
काँग्रेसमधील काही जण प्रियंका गांधींचे नाव पुढे करुन भाऊबहिणींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचेच वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन टीम
लखनौ, दि. १५- काँग्रेसमधील काही जण प्रियंका गांधींचे नाव पुढे करुन भाऊबहिणींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचेच वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. मतभेद निर्माण व्हावे यासाठी प्रियंका गांधींकडे पक्षातील महत्त्वाचे पद देण्याची मागणी पुढे येते असेही वर्मा यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसमधील काही नेते प्रियंका गांधींना राजकारणात उतरवण्याची मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही मागणी आणखी जोर धरु लागली. यावर बेनीप्रसाद वर्मा यांनी भाष्य केले आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांना राहुल गांधींना बाजूला करायचे आहे. राहुल गांधींचे खच्चीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणून कधी प्रियंका गांधीना राजकारणात उतरवण्याची मागणी केली जाते तर कधी पराभवाचे खापर राहुल गांधींवरच फोडले जाते. नरेंद्र मोदींची जागा घेण्याची क्षमता फक्त राहुल गांधींमध्येच आहे असेही बेनीप्रसाद यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे ५० आमदार भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात असून हे आमदार कधीही राज्यातील समाजवादी पक्षाची सत्ता पाडू शकतात असा इशाराही त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे. जर अखिलेश यादव सरकार चालवू शकत नसतील तर आता मुलायमसिंह यांनी पुढे यावे असेही त्यांनी म्हटले आहे.