आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल पंजाबात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2015 03:21 AM2015-06-19T03:21:11+5:302015-06-19T03:21:11+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात आत्महत्या करणाऱ्या सरदार सुरजितसिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल
फतेहगड साहिब : कर्जबाजारीपणाला कंटाळून गत आठवड्यात आत्महत्या करणाऱ्या सरदार सुरजितसिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी पंजाबातील ददुवाल गावात पोहोचले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एप्रिल महिन्यातील पंजाब दौऱ्यादरम्यान सरदार सुरजितसिंग यांची भेट घेतली होती. २८ एप्रिलला फतेहगड साहिब जिल्ह्यातील ददुवाल गावामध्ये राहणाऱ्या सुरजित यांनी आपल्या व्यथा राहुल यांना ऐकवल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याची विनंती केली होती. मात्र, याउपरही काहीच ठोस न झाल्याने निराश झालेल्या ६० वर्षीय सुरजितसिंग यांनी गत १० जूनला आत्महत्या केली होती. गुरुवारी त्यांची ‘भोग’(मृत्यूनंतरचा विधी) विधी होता.
राहुल गांधी यांनी या विधीत सामील होत सुरजित यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबियांसोबत सुमारे २० मिनिटे त्यांनी घालवली. यावेळी मीडियाशी बोलणे त्यांनी टाळले.
स्थानिक आमदार कुलजित सिंह नडला राहुल यांच्या सोबत होते. याशिवाय पक्षाचा कुठलाही ज्येष्ठ नेता त्यांच्या सोबत नव्हता. त्यांच्या दौऱ्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. (वृत्तसंस्था)