‘नायक’ ठरले राहुल!
By admin | Published: April 20, 2015 11:55 PM2015-04-20T23:55:28+5:302015-04-20T23:55:28+5:30
लोकसभेच्या आजच्या दिवसाचे ‘नायक’ ठरले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी! अख्खा दिवस त्यांच्या भोवती फिरत होता. सभागृहातील त्यांचा वावर मोठा आक्रमक
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
लोकसभेच्या आजच्या दिवसाचे ‘नायक’ ठरले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी! अख्खा दिवस त्यांच्या भोवती फिरत होता. सभागृहातील त्यांचा वावर मोठा आक्रमक; पण अदबशीर होता. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी काँग्रेसचेच सदस्य नव्हे, तर अन्य पक्षाच्या सदस्यांची लगबग सुरू होती. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्यांचा आजचा पहिला दिवस होता.
अकराच्या ठोेक्याला कामकाज सुरू झाले तशी त्यांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली. पण ते आलेच नाहीत..! राज्यमंत्री गिरिराजसिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांविषयी सभागृहात खडाजंगी चर्चा त्यावेळी सुरू होती. विरोधी पक्ष सरकारविरोधी नारे देत हौद्यात उतरला...नाऱ्यांनी सभागृह दणाणून गेले...आणि त्याच गरमागरम वातावरणात राहुल अत्यंत आक्रमक; पण हसतमुख चेहऱ्याने सभागृहात आले तेव्हा ११ वाजून २५ मिनिटे झाली होती. ते आले, विरोधी पक्ष जिथे बसतो त्या संपूर्ण आसनांमागून त्यांनी फेरी मारली. पाचव्या ओळीतील नेहमीचे आसन असलेल्या जागेवर न बसता ते दुसऱ्या ओळीत तिसऱ्या स्थानाकडे आले, त्यांनी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना वाकून अभिवादन केले, त्यांनीही अत्यंत हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले...व ते आसनावर स्थानापन्न होताच, गोंधळ वाढल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब झाले. त्यानंतर मात्र राहुल यांच्या दिशेने काँग्रेस खासदार आले. अनेकांवर त्यांनी नजर टाकली. मागच्या ओळीत बसलेले अशोक चव्हाण यांच्याशी हस्तांदोलन केले. राजीव सातव यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुप्रिया सुळे यांना हॅलो म्हटले. तेवढ्यातच ज्योतिरादित्य शिंदे तिथे आले तेव्हा राहुल यांनी त्यांच्या पोटात हलकासा बुक्का मारला, तेव्हा ज्योतिरादित्यांनीही त्यांच्या खांद्यावर तसेच केले. दोघांचीही गळाभेट झाली. ज्योतिरादित्य, राहुल, त्यांच्या बाजूला तारिक अन्वर, कमलनाथ व शेवटी मेहबुबा मुफ्ती एकाच ओळीत बाकावरील आसनांवर बसले. समोरच्या बाकांवर सोनिया गांधी, त्यांच्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे होते.
सोनियांनी राहुल यांना काही कागद दिले. त्यावर मोदी यांची छबी होती. तो मजकूर मंत्री व सत्ताधारी खासदार कशा पद्धतीने बेताल बोलले तो होता. त्यावर नजर खिळली असतानाच त्यांच्या मोबाईलवर एक मेल आला. त्याला उत्तर देण्यात ते गर्क झाले. सोनियांना त्यांनी तो मेल दाखविला. त्यांनी मान हलवून गुड म्हटले. तेवढ्यातच त्यांनी मोबाईल स्क्रीन सेव्हरवरील एक चित्र सोनियांना दाखविले. ते बघून त्यांची मुद्रा कुतूहलमिश्रित झाली. त्या एकदम हसल्याही. करड्या पांढऱ्या रंगाच्या चेहऱ्याचे कुत्र्याचे पिल्लू असलेले चित्र होते ते! त्यांनी मग त्याची दोन चित्रे दाखविली.