आगामी निवडणूक राहुलजी जिंकून देतील
By admin | Published: July 10, 2017 12:24 AM2017-07-10T00:24:35+5:302017-07-10T00:24:35+5:30
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची
धुरा येईल व सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
सलग चार वेळा गुणा येथून निवडून आलेले व लोकसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोत असलेले शिंदे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असेही म्हणाले की, काँग्रेसच्या दृष्टीने आता आत्मचिंतनाचा काळ संपला असून पक्षाने आता २०१९ ची निवडणूक डोळ््यापुढे ठेवून निश्चित असा कार्यक्रम आखायला हवा.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राहुल गांधी सध्याही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत व भविष्यातही नेतृत्व करत राहतील. राहुल गांधी यांना समर्थन देण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता असल्याने तेच आगामी निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून लोकांपुढे जातील.
शिंदे असेही म्हणाले की, सन २००३-०४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘रालोआ’ सरकारने ‘इंडिया शायनिंग’चा खूप गवगवा केला. पण लोकांनी त्यांना नाकारले. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच लोकांना सदा सर्वकाळ फसविता येत नाही. त्यामुळे पायाखालची वाळू सरकू लागलेले आताचे मोदी सरकारही केवळ प्रसिद्धीतंत्राने टिकू शकणार नाही.
पण त्याचबरोबर काँग्रेसलाही नवा कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल व लोकांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असे सांगून ते म्हणाले की, २०१४ नंतर आता तीन वर्षे उलटली. त्यामुळे आत्मचिंतन करून त्या पराभवाची कारणे शोधण्याचा काळ आता संपला आहे. आता काँग्रेसला निश्चित ध्येयधोरणे व कार्यक्रम घेऊन प्रत्येक निवडणुकीत उतरावे लागेल.
>केवळ मोदीकेंद्रित टीका करून भागणार नाही. काँग्रेसला स्वत:ची धोरणे, विचार व कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जाऊन जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल. यासाठी पक्षात गुणवत्ता व क्षमता याला प्राधान्य द्यावे लागेल.
- ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते