मच्छीमारांच्या प्रश्नावरून राहुल यांची मोदींवर टीका
By admin | Published: May 27, 2015 11:52 PM2015-05-27T23:52:41+5:302015-05-27T23:52:41+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.
वक्कड (केरळ) : मच्छीमारांपासून ‘सागर माते’ला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी घोषणा करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.
‘जमीन ही शेतकऱ्यांची माता आहे, तर सागर ही तुमची माता आणि तुमची माता हिसकावून ती दुसऱ्या कुणाच्या तरी ताब्यात देण्याचा त्यांचा (मोदी सरकार) प्रयत्न आहे’, असे राहुल गांधी म्हणाले. केरळच्या चावक्कड येथे आयोजित मच्छीमारांच्या संमेलनात ते बोलत होते.
मासेमारीवरील ४५ दिवसांची बंदीची मुदत वाढवून ६१ दिवस करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मीनाकुमारी अहवालातील काही तरतुदींच्या विरोधात केरळमधील मासेमारी करणाऱ्यांनी आंदोलन छेडलेले आहे.
संसदेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारविरुद्ध हल्लाबोल करणारे राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, कोळी आणि आदिवासी हे राष्ट्राचा आत्मा आहेत आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रालोआ सरकार परीब कोळी, शेतकरी आणि आदिवासींसोबत लढत नसून देशाच्या आत्म्याशी लढत आहेत. (वृत्तसंस्था)
सागरही हिसकावून घेण्याचा प्रयत्न
मोदी सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची मौल्यवान जमीन हिसकावून घेत आहे, त्याचप्रमाणे मच्छीमारांचा सागरही हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतात जमिनीला सोन्याची किंमत आली आहे. त्यांना हे सोने शेतकऱ्यांना नव्हे तर आपल्या मित्रांना द्यावयाचे आहे. तसेच हा सागरही मच्छीमारांना नव्हे तर मित्रांना द्यावयाचा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.