राहुल यांची मोदी, ममतांवर टीका
By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:41+5:302016-04-03T03:52:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता
नियामतपूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता गिरवीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.
डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत आयोजित एका संयुक्त सभेत ते बोलत होते. मोदी यांच्यावर लक्ष्य साधताना ते म्हणाले, पंतप्रधान या देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसची सरकारे मनमानीपणे पदच्युत केली. देशात केवळ एकच नेता असावा आणि तो ते स्वत: असावेत अशी मोदींची इच्छा आहे. एवढेच नाहीतर येथील जनतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी थोपविण्याची मोहीमच राबविली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. मी संसदेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्या (ममता बॅनर्जी) जे सांगतात तेच होते. इतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे या नेत्यांचे म्हणणे असते. हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीत सुद्धा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (वृत्तसंस्था)
अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी, जखमींना भेटले
कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी केली. पीडितांचे सांत्वन करण्यासाठी मी येथे आलो असून, या मुद्यावर राजकारणाची आपली अजिबात इच्छा नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या या उड्डाणपूल अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे.
राहुल गांधी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात जाऊन अपघातातील जखमींचीही विचारपूस केली. उड्डाणपुलाच्या बांधकामातील त्रुटींकडे लक्ष वेधले असता मी येथे जखमींच्या भेटीसाठी आलो असून, राजकारणावर बोलणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्षांनी स्पष्ट केले.
भाजपने साधले शरसंधान
उड्डाण पूल दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीत व प. बंगालमधे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर पकडला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी घटनास्थळी गेले. भाजपने मात्र या घटनेवर थेट शरसंधान करीत म्हंटले की छायाचित्राव्दारे स्वत:ची प्रसिध्दी घडवण्याची आणखी एक संधी राहुल गांधींनी साधली.